विविध मागण्यासाठी कोळी बांधवांचा निषेध मोर्चा

। उरण । वार्ताहर ।
वरळी कोळीवाडा मुंबई येथे कोस्टल रोडला विरोध करण्यासाठी, कोळी मच्छिमार बांधवांचे मागण्या पूर्ण होत नसल्याने त्याचा निषेध करण्यासाठी व वरळीकरांना पाठिंबा देण्यासाठी रायगड, पालघर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई हनुमान कोळीवाडा, रत्नागिरी येथून सर्व कोळी बांधव जमा झाले होते. आदिवासी कोळी समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य आणि पारंपरिक मच्छिमार बचाव कृती समिती, श्री हनुमान कोळीवाडा मच्छिमार सोसायटी च्या वतीने वरळी कोळीवाडा येथे प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. शेतकर्‍यांच्या जागा घेऊन आज शेतकर्‍यांना देशोधडीला लावले आहे. आता मात्र शासनाकडे बलाढ्य कंपन्या रिलायन्स, सिडको, एमएमआरडीए, ओएनजीसी, नैना प्रकल्प अशा अनेक कंपन्यांना जागा देण्यासाठी शिल्लक राहिल्या नाहीत. म्हणून शासनाने समुद्रात भराव करुन जागा तयार करत असून मच्छिमार क्षेत्र पूर्णपणे नष्ट करत आहेत. समुद्र किनार्‍यावरचे सर्व कोळीवाडा उद्ध्वस्त करुन मोठ्या प्रकल्पांना कोळीड्याच्या जागा देतात. यामुळे सर्वांत मोठा लोकशाहीचा घात होत आहे असे वरळी गावातील ग्रामस्थ शरद कोळी, सागर वराळीकर, प्रणाली कोळी, मनाली वरळीकर यांनी प्रतिक्रिया दिल्या. यावेळी मंगेश कोळी, नरेश कोळी आदी उरण तालुक्यातील अनेक मच्छिमार, कोळी बांधव उपस्थित होते. भविष्यात मासेमारी टिकून राहण्यासाठी वरळी कोळीवाड्यातील किव्हलँड बंदर येथील जाण्या येण्यासाठी स्पँन 200 मिटर अंतर मिळावे, प्रकल्पग्रस्त म्हणून सर्व मच्छिमार बंधु-भगिनिंना कायद्यानुसार नुकसान भरपाई मिळावी, मच्छिमार बांधवांच्या जाळ्यांची नुकसान भरपाई मिळावी, मासेमारी क्षेत्र भरावामुळे बाधीत झाले आहे त्याबद्दल कायद्यानुसार नुकसान भरपाई मिळावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. जर शासनाने मागण्या पूर्ण केल्या तरच समुद्रात कोस्टल रोड कामकाज चालू करावे अन्यथा काम बंद करण्याचा इशारा शासनाला स्थानिक मच्छिमार, कोळी बांधवांनी, विविध सामाजिक संस्थांनी दिला आहे.

Exit mobile version