| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्हा विविधतेने नटलेला जिल्हा आहे. येथील निर्यात व्यवसायास मोठा वाव आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निर्यात व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर दिला जाईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात दि.14 जानेवारी रोजी निर्यात प्रचालन समितीची ऑनलाईन बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस. हरळय्या, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्ज्वला बाणखेले, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजयकुमार कुलकर्णी, तळोजा मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे व महाड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी बैठकीच्या सुरुवातीला रायगड जिल्ह्यातील निर्यात प्रचालन क्षेत्रात वाव असलेल्या विविध उद्योगांची माहिती घेतली. यासंदर्भात त्यांनी जिल्ह्यातील उद्योजकांना आवाहन केले आहे की, त्यांनी निर्यात व्यवसायासाठी रायगड जिल्ह्यात कोणकोणत्या क्षेत्रात वाव आहे, निर्यात व्यवसाय वाढीस लागण्यासाठी कोणकोणते घटक व अन्य सोयी सुविधांची आवश्यकता आहे याबाबत जिल्हा प्रशासनास पुढे येऊन सांगावे. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री. हरळय्या यांनी जिल्ह्यात प्रामुख्याने गणेशमूर्ती, मत्स्यव्यवसाय, लोखंड व स्टील, केमिकल, लॉजिस्टिक, पांढरा कांदा, अल्फान्सो आंबा, फार्मास्यूटिकल अशा विविध क्षेत्रात निर्यात व्यवसाय वाढीस लावण्यासाठी पूरक परिस्थिती असल्याचे सांगितले.
पांढरा कांदा, आंब्याचे उत्पादन
जिल्ह्यात पांढरा कांद्याचे 250 हेक्टर उत्पादन क्षेत्र असून, जवळपास 4 हजार मेट्रिक टन इतके उत्पादन होत आहे. यात 200 ते 225 शेतकरी सक्रिय आहेत. या पांढर्या कांद्याला नुकतेच दि.9 सप्टेंबर 2021 रोजी अलिबाग तालुक्यासाठी भौगोलिक मानांकनास मान्यताही मिळाली आहे. त्याचप्रमाणे रायगडच्या अल्फान्सो मँगोची जिल्ह्यात जवळपास 14 हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड होत असून, जवळपास 30 हजार मेट्रिक टन उत्पादन आहे. रायगड जिल्ह्यास 122 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून, येथे मत्स्योत्पादन व्यवसायात अंदाजे 40 हजार मेट्रिक टन उत्पादन घेतले जाते.
जिल्ह्याचा निर्यात व्यवसाय 20 कोटी
केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज च्या अंतर्गत डायरेक्टर जनरल ऑफ कमर्शियल इंटेलिजन्स अँड स्टॅटिस्टिकस या विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, सध्या महाराष्ट्राचा निर्यात व्यवसाय रू.2.5 लाख कोटी इतका असून, रायगड जिल्ह्याचा ऑक्टोबर 2021 पर्यंतचा निर्यात व्यवसाय जवळपास रु.20 हजार कोटी म्हणजेच महाराष्ट्राच्या एकूण निर्यात व्यवसायाच्या 7.56 टक्के इतका आहे, तर एकूण कोकण पट्ट्यातील निर्यात व्यवसायात रायगड जिल्ह्याचे योगदान 34 टक्के आहे.
- रायगड जिल्ह्यातील जास्तीत जास्त उद्योजकांनी निर्यातक्षम उद्योगवाढीसाठी पुढे यावे, त्यांना जिल्हा प्रशासनाकडून सर्व प्रकारचे मार्गदर्शन व सहकार्य केले जाईल. – महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी