पोषण आहारातील धान्य निकृष्ट; तांदळाच्या पोत्यात कणीसोबत पक्ष्यांची पिसे, उंदराच्या विष्ठा

। पेण । संतोष पाटील ।
पेण शहरासह तालुक्यात शालेय पोषण आहारात निकृष्ट दर्जाचे धान्य पुरविले गेल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.त्याची दखल घेऊन याबाबतचा अहवाल पाठविण्याचे निर्देश जि. प. पोषण आहार विभागाचे प्रमुख आर.एच.गायकवाड यांनी पेण-पाली पोषण आहार प्रमुख शिल्पा पवार यांना दिलेले आहेत. शासन नियमानुसार माध्यान्न भोजन आहार ही योजना कित्येक वर्ष सुरू आहे. मात्र, लॉकडाऊनच्या काळात या योजनेमध्ये अनेक बदल झाले. त्यानंतर वेळेवर न देणे, योग्य प्रमाणात न देणे, निकृष्ट दर्जाचे देणे असा सारा प्रकार ठेकेदारांकडून पेण, पाली तालुक्यात वाढल्याच्या तक्रारी आल्या होत्या.

धान्यांचे दर वाढलेले
महत्त्वाची बाब म्हणजे जे धान्य पुरविले जाते त्यांच्या दराचा विचार केला तर सर्वसामान्यांना शॉक लागल्याशिवाय राहणार नाही. मुगडाळ 103 रुपये किलो, तुरडाळ 102 रुपये किलो, मसुरडाळ 102 रूपये किलो, हरभरा 82 रुपये किलो, चवळी 95 रुपये किलो, मटकी 105 रुपये किलो, मूग 89 रुपये किलो, वाटाणा 95 रुपये किलो, कांदा लसूण मसाला 197 रुपये किलो, हळद पावडर 197 रुपये किलो, मीठ 14 रुपये किलो, जिरे 250 रुपये किलो, मोहरी 94 रुपये किलो, मिरची पावडर 192 रुपये किलो, गरम मसाला 192 रुपये किलो अशाप्रकारे दर आहेत.

असे आहे दर्जाहिन धान्य
पोषण आहारातील वाटाणा पाहिलात तर मुगाएवढाच लहानलहान. चवळी हरभरा याला पाखरे लागलेली आहेत. मुगडाळ, तुरडाळ, मसुरडाळ यामध्ये डाळ कमी आणि भुसा व कडधान्यांची टरफले जास्त. मिरची पावडरची अवस्था तर दैन्यावस्थाच. हळद पिवळी नसून राखाडी रंगाचीच, गरम मसालाला कोणताच वास नसून फक्त चॉकलेटी कलरची भुकटी, जिरे, मोहरी याकडे तर न पाहणेच चांगलेच. मीठची अवस्थाही न बोलण्यासारखीच आणि तांदळाच्या पोत्यात तर कणी सोबत पक्ष्यांची पिसे, उंदरांच्या विष्ठा, असा प्रकार सध्या समोर येत आहेत. बचत गटाच्या प्रमुखाने याबाबत मुख्याध्यापकांकडे तक्रार केल्यानंतर उत्तर ते काय आमच्या घरी पिकते का? असे उत्तर देण्यात येते.

भविष्यात जर एखादी दुर्दैवी घटना घडली तर मुख्याध्यापक तथा शासनाचे अधिकारी हात वर करुन मोकळे होतील. पंरतु, खरी जबाबदारी ही शासनाच्या अधिकार्‍यांची व मुख्याध्यापकांची आहे. येणारे धान्य हे योग्य प्रकारे येत आहे की, नाही त्याचा दर्जा कोणत्या प्रकारचा आहे. जर ठेकेदाराला योग्य दर मिळत असेल तर त्यांने माल ही योग्य व चांगल्या प्रतीचा देणे हे त्याचे कर्तव्य तथा जबाबदारी आहे. परंतु असे होत नाही. त्यामुळे निकृष्ट दर्जाचा पोषण आहार विद्यार्थ्यांना खावं लागत आहे. असे असताना देखील निकृष्ट दर्जाचे धान्य पुरवणार्‍या ठेकेदारावर कारवाई होत नाही,असा बचत गटाचा आरोप आहे.

ज्या वेळेला मार्च-एप्रिलमध्ये शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला त्या वेळेला शासनाकडून शालेयपोषण आहार देणार्‍या संस्थांना संपर्क करण्यात आला. आणि तातडीने माध्यान्न आहार भोजन शिजवून देण्याची विनंती केली. शासनाच्या या विनंतीला मान देऊन महिला बचत गटाने मध्यान्न आहर भोजन शिजवून देण्याचे ठरविले. त्यांना त्वरित महिनाभराच्या आत धान्य तसेच शिजवण्याचे मानधन द्यायचे ठरले. परंतु आजतागयत ना मानधन दिले ना मार्च-एप्रिल चे धान्य दिले. याकडे हेतुपुत्सर शासनाचे दुर्लक्ष होत आहे. मार्च-एप्रिल मध्ये बचतगटाने उसनवार करून पोषण आहार पुरवले. परंतु त्यांना आजतागयत धान्य व स्वयंपाकी मानधन मिळालेला नाही. जूनपासून नव्याने शाळा सुरू झाल्या आणि ठेकेदाराने जुने धान्य न टाकता नव्याने धान्य टाकले. त्यामुळे जुन्या धान्याविषयी ना ठेकेदार काही बोलत आहे ना शासन काही बोलत आहे. याविषयी जिल्हा परिषदेचे पोषण आहार विभागाचे प्रमुख आर.एच.गायकवाड यांना विचारणा केली असता त्यांनी पेण पाली पोषण आहारप्रमुख शिल्पा पवार यांच्याशी कॉन्फरन्स फोनच्या माध्यमातून प्रस्तुत प्रतिनिधीसमवेत चर्चा घडवून आणत ही वस्तुस्थिती मान्य केली.

जवळपास नव्वद टक्के शाळांना मार्च-एप्रिलचे धान्य तसेच बिले मिळाली नाहीत. परंतु, लवकरच धान्य व बिले दिली जातील. तसेच जे काही निकृष्ट दर्जाचे धान्य येत आहे. त्याबद्दल लेखी तक्रार आल्यास आपण त्यावर निश्‍चित कारवाई करु.

शिल्पा पवार, पेण,पाली पोषण आहारप्रमुख

ज्या शाळांमध्ये निकृष्ठ धान्य सापडले आहेत त्याचे नमुने घेऊन तपासणी करावी आणि वरिष्ठांकडे अहवाल पाठवावा.

आर.एच.गायकवाड,जि.प.शालेय पोषण आहार प्रमुख

Exit mobile version