आनंद पवार यांची मुक्या जनावरांसाठी माणुसकी
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान या पर्यटनस्थळी वाहनांना बंदी आहे, त्यामुळे पर्यटकांच्या सोयीसाठी घोडे वाहतुकीचे साधन बनले आहे. गेली 150 वर्षे माथेरानमध्ये घोडे हेच वाहतुकीचे साधन आहेत. त्या घोड्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करताना अश्वपालकांना अडचणी येत असतात. प्राणीप्रेमी असलेले आनंद पवार यांनी माथेरानमधील घोड्यांसाठी पाणपोई सुरु केली आहे.
माथेरानमध्ये 450 घोडे असून, ते घोडे पर्यटकांना सेवा देत असतात. पर्यटन हंगामात अनेकदा हे घोडे दिवसभर पर्यटकांना सेवा देत असतात आणि त्यावेळी त्यांना तबेल्यापर्यंत जातादेखील येत नाही. परिणामी, घोड्याला लागणारे पिण्याचे पाणीदेखील जंगलात शोधून देण्याची वेळ अश्वपालकांवर येत असते. हे लक्षात घेऊन या मुक्या प्राण्यांसाठी माथेरान शहरात नेहमी पर्यटनासाठी येणारे पर्यटक आनंद पवार यांनी घोड्यांसाठी पाणपोई उभारण्याचा प्रस्ताव अश्वपाल संघटना यांच्यापुढे ठेवला. त्यांनतर अश्वपाल संघटनेकडून माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेची परवानगी घेऊन पाणपोई बनवली. त्यासाठी आवश्यक असलेली 10 हजार लीटर क्षमतेची पाण्याची टाकी आणि अन्य साहित्य पवार यांनी उपलब्ध करून दिले आहे.
या पाणपोईचे लोकार्पण आनंद पवार, माथेरान अश्वपाल संघटनेच्या अध्यक्षा आशा कदम, माथेरान पालिकेचे लेखापाल अंकुश इचके, कार्यालयीन प्रमुख सदानंद इंगळे, नगररचनाकार बांगारे, विश्वास पाटील, अश्वपाल इरफान शेख, सचिन पाटील, बंटी कदम, माथेरान नागरी पतसंस्थेचे तज्ज्ञ संचालक गिरीश पवार आदी उपस्थित होते.