। पोयनाड । वार्ताहर ।
अलिबाग-वडखळ मार्गावरील कार्लेखिंडीतील रस्त्याच्या कडेला डोंगरावर असलेली झाडे धोकादायक ठरत आहेत. पावसाळ्यात मातीचर धूप होऊन ती कधीही पडु शकतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

परिणामी रस्त्याच्या कडेला असणार्या धोकादायक झाडांची छाटणी करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. पावसाळ्यात कार्लेखिंडीतील वळणावळणाचा रस्ता तसेच धबधब्यामुळे निसर्गाचा आनंद घेणारे अनेक पर्यटक या रस्त्यावरुन प्रवास करतात. रस्त्यावरुन हजारो वाहनांची ये- जा सुरु असते.

कार्लेखिंडीतील धोकादायक असलेल्या अंदाजे दहा ते पंधरा झाडांची मुळे मोकळी झाली आहेत. त्यांची माती निघुन गेली आहे. अशा धोकादायक झाडांमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काही वर्षापूर्वी राऊतवाडी येथे एका दुचाकी चालकाच्या अंगावर झाड पडुन त्याचा मृत्यु झाल्याची घटना घडली होती. त्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी धोकादायक झाडे कापण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे.
