| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली. त्याच्या काही महिने आधीपासूनच श्रीवर्धन शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा एक गंभीर प्रश्न झाला होता. श्रीवर्धन तालुक्यातील रानवली येथे असलेल्या धरणातून श्रीवर्धन शहर व धरणानजिकच्या दोन-तीन गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. या रानवली धरणामुळे पाण्याची चांगली सोय झाल्यामुळे श्रीवर्धन शहरातील पिण्याच्या पाण्याच्या बऱ्याचशा विहिरी बुजविण्यात आल्या तर काही वापरातून बाद झाल्या. परंतु, बरीच वर्षे धरणातुन पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनींची दुरूस्ती न झाल्याने त्या ठिकठिकाणी फुटून ठिकठिकाणी पाणी वाया जाऊ लागले. नंतर 2022-23 मध्ये सुमारे 23 कोटी रुपये खर्चून जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला. त्यावेळी जुन्या जलवाहिन्या काढून तेथे नवीन जलवाहिन्या टाकण्यात आल्या. परंतु, या नवीन टाकलेल्या जलवाहिन्या देखील काही महिन्यांतच ठिकठिकाणी वारंवार फुटत आहेत. त्यामुळे नळांतून गढूळ पाणी येणे, दोन-दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहणे, कमी दाबाने पाणी येणे असे प्रकार वारंवार होऊ लागल्यामुळे नागरिक पुरते वैतागले आहेत. त्यामुळे जलवाहिन्या बदलतांना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले का? अशी शंका नागरिक घेऊ लागले आहेत. नगर परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे वेळीही प्रचारात या पाणी प्रश्नावर अनेक वेळा आरोप-प्रत्यारोप झाले होते. आताही शहरातील गंद्रे नाक्यावर पाण्याची लाईन लिकेज होऊन सुमारे आठवडाभर हजारो लिटर पाणी वाया जात आहे.
श्रीवर्धनमध्ये पाण्याच्या प्रश्नावरून जनक्षोभ
