कोलाड पोलिसांच्या संकल्पनेला प्रतिसाद
| कोलाड | वार्ताहर |
कोलाड पोलिसांच्या संकल्पनेला प्रतिसाद देत मंगलमूर्ती मित्र मंडळ खांबच्या गणेशोत्सव देखाव्यातून सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यात आली आहे.
सायबर क्राइम दिवसेंदिवस वाढत आहे, अशा परिस्थितीत प्रत्येक इंटरनेट वापरकर्त्यांसाठी या सायबर गुन्ह्यांविषयी माहिती व ज्ञान आवश्यक असल्याने याबाबत जागरूकतादेखील खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे गणेशोत्सव साजरा होत असताना सायबर क्राइमबाबत ग्रामीण भागात जनजागृती होणे आवश्यकता असल्याने कोलाड विभागातील सार्वजनिक गणेशोत्सव देखाव्यातून सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती ही संकल्पना कोलाड पोलिसांनी गणेशोत्सव मंडळाकडे मांडली होती. पोलीस अधिकारी अजित साबळे यांच्या संकल्पनेला प्रतिसाद देत मंगलमूर्ती मित्र मंडळ खांबच्या गणेशोत्सव देखाव्यातून सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यात आली आहे.
या मंडळाने गणेशोत्सव मंडपात सायबर गुन्ह्यातीळ ईमेल स्पॅम, फिशिंग, पायरेसी, डेटा चोरी, हॅकिंग इ. तसेच कर्ज मिळून देतो असे सांगून फसवणूक, लोन ॲप फसवणूक, सेक्सटॉरशन, महिलांचे फोट वापरून अकाऊंट बनवून फसवणूक, हे सर्व सायबर गुन्हे असून, ग्रामीण भागातील जनतेची फसवणूक होऊ नये म्हणून मंगलमूर्ती मित्र मंडळाच्या गणेशोत्सव देखाव्यातून जनजागृती करण्यात आली आहे. यासाठी मंडळातील सर्व पदाधिकारी, सदस्य यांनी मेहनत घेतली आहे. पोलीस अधिकारी अजित साबळे, गुप्त वार्ता विभागाचे सहकारी नरेश पाटील यांनी खांब येथे जाऊन मंगलमूर्ती मित्र मंडळाची भेट घेऊन त्यांना सायबर गुन्हे होऊ नये म्हणून या गुन्ह्यांबाबत माहिती दिली. यावेळी बहुसंख्य मंडळाचे सदस्य उपस्थित होते.