| नागोठणे | प्रतिनिधी |
नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सपोनि रविंद्र पारखे यांनी साखरचौथ गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागोठण्यात विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंगळवारी भेटी देऊन साखरचौथ गणरायाचे दर्शन घेतले. याच अनुषंगाने मंगळवारी रात्री वरवठणे गावातील गणेश आळी येथील गणेशोत्सव मंडळाच्या साखरचौथ गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन सपोनि रविंद्र पारखे यांनी उपस्थित ग्रामस्थ, तरुण व महिला वर्गाला सायबर क्राईमपासून सावध राहण्याचे आवाहन आपल्या बहुमोल मार्गदर्शनातून केले. यावेळी मार्गदर्शन करताना सपोनि रविंद्र पारखे म्हणाले की, आज प्रत्येक नागरिक आपल्या मौल्यवान वस्तू व पैसे सुरक्षित ठेवण्याबाबत जागरूक झाला आहे. नागरिक आपले पैसे व दागिने बँकेत ठेवत असल्याने घरफोडी करून चोरी करण्याचा प्रयत्न केला तरी चोरांच्या हाती फारसे काही लागत नाही. त्यामुळे चोरट्यांनीही आता आपली कार्यपद्धती बदलली असून, मोबाईलच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. ते पुढे म्हणाले की, सायबर क्राईम म्हणजे मोबाईल किंवा इंटरनेटच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक फसवणूक करून पैसे लुटणे होय. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपला ओटीपी, एटीएम पिन, बँक खात्याची माहिती, पासवर्ड किंवा इतर गोपनीय माहिती देऊ नये, तसेच काही चुकीचे वाटल्यास 1930 व 112 या क्रमांकावर तक्रार करावी असे आवाहनही सपोनि रविंद्र पारखे यांनी केले.







