| उरण | प्रतिनिधी |
नवी मुंबई वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त राहुल खाडे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘शाळा दत्तक योजना 2026-27’ अंतर्गत न्हावाशेवा वाहतूक शाखेतर्फे मोरू नारायण म्हात्रे विद्यालय, कोपर येथे वाहतूक जनजागृती कार्यक्रम तसेच पर्यावरणपूरक संदेश देणाऱ्या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण व्हावी, वाहतूक शिस्त अंगीकारावी आणि सुरक्षित रस्ते संस्कृती रुजावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी न्हावाशेवा वाहतूक शाखेचे भिमराव गोंधळी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा, वाहतूक सिग्नलचे महत्त्व, झेब्रा क्रॉसिंगचा वापर, हेल्मेट व सीटबेल्टची आवश्यकता तसेच सायकलस्वार आणि पादचाऱ्यांनी घ्यावयाची खबरदारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच पर्यावरण संरक्षण, प्रदूषणमुक्त वाहतूक आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सहभागातून सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीद्वारे ‘वाहतूक शिस्त पाळा, पर्यावरण वाचवा’ असा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. कार्यक्रमास मोरू नारायण म्हात्रे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सायली वडवलकर, प्रणिता गोळे, पूजा कुमारी, प्रफुल्ल शिंदे, भैय्यासाहेब गायकवाड तसेच 50 ते 60 विद्यार्थी उपस्थित होते.
नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी सुरू केलेली ‘शाळा दत्तक योजना’ ही केवळ वाहतूक नियमांचे प्रबोधन करणारी योजना नसून विद्यार्थ्यांमधून जबाबदार वाहतूक दूत घडविण्याचा अभिनव उपक्रम आहे. न्हावाशेवा वाहतूक शाखेच्या हद्दीतील उर्वरित शाळांमध्येही अशाच प्रकारचे जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.







