। कर्जत । प्रतिनिधी ।
लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या विविध फिरत्या दवाखाना युनिट्समार्फत राष्ट्रीय पोषण महिना साजरा करण्यात आला. यामधे कर्जत, मुरबाड, अकोला आणि वाशिम या चार तालुक्यात एकूण 38 शाळांमध्ये राष्ट्रीय पोषण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाद्वारे 2,320 विद्यार्थ्यांना आणि पालकांना पौष्टिक आहार आणि आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली.
प्रत्येक शाळेमध्ये पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन व व्हिडीओ सादरीकरण करून माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये सहभाग वाढावा यासाठी बालक-पालक पौष्टिक भेळ स्पर्धादेखील आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमधे प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला मल्टीव्हिटॅमिन सिरप पारितोषिक म्हणून देण्यात आले.
यावेळी पोषणाच्या विविध घटकांविषयी माहिती देण्यात आली. पौष्टिक घटकांची ओळख कर्बोदके, जीवनसत्त्व, प्रोटीनचे महत्त्व आणि अन्न पचनासाठी व चांगल्या आरोग्यासाठी पाण्याचे महत्त्व याबाबत माहिती देण्यात आली.
या उपक्रमात विविध शाळांनी सहभाग नोंदविला. कर्जत तालुका फिरता दवाखाना युनिटमध्ये तालुक्यातील 10 शाळांमध्ये 395 विद्यार्थी आणि पालक सहभागी झाले होते. मुरबाड तालुक्यातील धसई भागातील 8 शाळांमध्ये 422 विद्यार्थी आणि पालक सहभागी झाले होते. अकोलामध्ये फिरता दवाखाना युनिट बार्शीटाकळी तालुक्यातील 8 शाळांमधील 803 विद्यार्थी व पालक सहभागी होते. तर वाशिम फिरता दवाखाना युनिट मंगरुळपीर तालुक्यातील 12 शाळांमध्ये 700 विद्यार्थी आणि पालक सहभागी होते.
या उपक्रमात चारही फिरता दवाखाना युनिटच्या मेडिकल ऑफिसर, फार्मासिस्ट्स, मेडिकल सोशल वर्कर्स, नर्सेस आणि मल्टीपर्पज वर्कर यांनी शाळांना भेट देऊन प्रत्यक्ष संवाद साधला. राष्ट्रीय पोषण महिन्याच्या निमित्ताने लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या फिरत्या दवाखाना युनिट्सने दिलेली ही सेवा केवळ आरोग्य विषयक शिक्षणापुरती मर्यादित राहिली नाही, तर गावोगावी आरोग्याबाबत सकारात्मक विचारांची पेरणी केली.






