| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
पनवेल रेल्वे स्थानक परिसरात वाढत्या अपघाती मृत्यू व जखमी होण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याच्या वतीने बुधवारी (दि.22) ‘जीवन रक्षा अभियान’ अंतर्गत विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम सकाळी 9.30 ते 11.00 या वेळेत फलाट क्रमांक 2/3 च्या सीएसएमटी बाजूस पार पडली.
मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात पोलीस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड यांनी मानव साखळी उभारून प्रवाशांना रेल्वे रुळ ओलांडण्याचे धोके समजावून सांगितले. लोकल पकडण्याच्या घाईत अनेक प्रवासी जीव धोक्यात घालून ट्रॅक ओलांडत असल्याने त्यांना सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देण्यात आले.
मोहीमेदरम्यान ‘अवाजवी धाडस टाळा, जीवन अनमोल आहे’, ‘लाईन क्रॉसिंग करू नका, घरी कोणीतरी तुमची वाट पाहत आहे’, ‘धावती लोकल थांबत नाही, तुम्ही थांबा’, ‘रेल्वेचे नियम पाळा, अपघात टाळा’ अशा प्रभावी घोषणांद्वारे जनजागृती करण्यात आली. तसेच रेल्वे प्रवासादरम्यान स्टंटबाजी टाळण्याचे, संशयास्पद वस्तूंना हात न लावता तात्काळ रेल्वे पोलिसांना माहिती देण्याचे आणि अडचणीच्या प्रसंगी जीआरपी हेल्पलाइन क्रमांक 1512 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
या मोहिमेत दोन पोलीस उपनिरीक्षक, सुमारे 30 पोलीस अंमलदार व 10 होमगार्ड सहभागी झाले होते. प्रवाशांनीही या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे पोलिसांच्या जनजागृतीचे स्वागत केले.
‘वेळ वाचविण्यासाठी आयुष्य धोक्यात घालू नका. सुरक्षित प्रवास हीच खरी जबाबदारी आहे,’ असा संदेश देत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी सर्व रेल्वे प्रवाशांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले.
‘जीवन रक्षा अभियान’ अंतर्गत जनजागृती
