| रायगड, मुंबई | जिल्हा प्रतिनिधी |
मतचोरी आणि मतदार याद्यांमधील घोळाबद्दल निवडणूक आयोगाचा निषेध नोंदवून लोकशाहीचा आणि खऱ्या मतदारांचा आवाज बुलंद करण्यासाठी शेकाप, महाविकास आघाडी-मनसेच्यावतीने मुंंबईत शनिवारी (दि.1) सत्याचा महामोर्चा काढण्यात आला. असत्याविरोधात काढण्यात आलेल्या या धडक मोर्चाला लाखोंची गर्दी उसळली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादीच्या खासदार सप्रिया सुळे, आ. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, कम्युनिस्ट पक्षाचे नेते रानडे, यांच्यासह डाव्या पक्षांचे वरिष्ठ नेतेमंडळी उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणातून निवडणूक आयोगाला मतचोरीचा जाब विचारत चांगलेच धारेवर धरले. मुंबईच्या फॅशन स्ट्रीट ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता.
दुबार मतदार यांद्याविरोधात मुंंबईत शनिवारी शेतकरी कामगार पक्ष, महाविकास आघाडी-मनसेच्या वतीने सत्याचा विराट मोर्चा आझाद मैदानावर काढण्यात आला. चर्चगेट ते आझाद मैदानापर्यंत असलेल्या मोर्चाला दुपारी साडेबारानंतर सुरुवात झाली. सरकारसह निवडणूक आयोगाविरोधात घोषणा देण्यात आला. या मोर्चात लाखोंच्या संख्येेने कार्यकर्ते सहभागी झाले होते. या विराट मोर्चाला अलोट गर्दी झाल्याचे दिसून आले. दरम्यान, कार्यकर्त्यांनी बोगस मतदार यादीची तिरडी तयार करून अंत्ययात्रा काढली. यावेळी आगळ्या वेगळ्या पद्धतीने निवडणूक आयोगाच्या कारभाराचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शेकाप कार्यालयीन चिटणीस ॲड. राजेंद्र कोरडे, राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य अनिल पाटील, शेकाप अलिबाग तालुका चिटणीस सुरेश खैरे आदींसह लाखो कार्यकर्ते उपस्थित होते.
बोगस मतदार याद्या दुरुस्त करा: बाळासाहेब थोरात
मागच्या निवडणुकांवेळी असलेल्या मतदार याद्यांमध्ये अनेक बोगस मतदार आहेत. माझ्या मतदारसंघात ग्रामीण भागात साडेनऊ हजार मतदार याद्या बोगस आहेत, त्यावर हरकती घेतल्या. त्या दुरुस्त झाल्या पाहिजेत, अशी भूमिका घेतली. त्यावेळी दुरुस्त करण्याचा अधिकार नाही, असे लेखी उत्तर तहसीलदारांनी दिले आहे. हा गंभीर प्रश्न आहे. बोगस मतदार याद्या दुरुस्त झाल्यानंतरच निवडणुका घ्या, अशी मागणी काँग्रेसेचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली.
मतचोरांना दिसल्यास फटकवा: उद्धव ठाकरे
संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर अशा प्रकारची पक्षांची एकजूट आज दिसून आली आहे. आजचा मोर्चा हा लोकशाहीचे नेतृत्व करण्यासाठी आहे. मते चोरणाऱ्यांना वाटणारी ठिणगी नसून वणवा आहे. ही ठिणगी उद्या वणवा कधी होईल हे सत्ताधाऱ्यांना कधीच कळणार नाही. सर्व जागरुक देशभक्त आहेत. सर्व जागे आहेत. जागे राहा अन्यथा ॲनाकोंडा येईल. या ॲनाकोंडाला अडकावे लागणार आहे. मराठी माणसांसह हिंदुत्वासाठी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. निवडणुका होणे गरजेचे आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सर्वजण एकत्र आले आहेत. सर्वांनी मतदार यादीमधील नावे तपासा, मते चोरणारे सापडल्यास त्यांना तिथे फटकवा, असे शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, जशा निवडणुका होतील, तशी त्यांची दडपशाही सुरु होणार आहे. निवडणूक आयोग लाचार झाला आहे. त्यामुळे सर्व पुरावे घेऊन न्यायालयात जाणार आहोत. अन्यथा जनतेचे न्यायालयच ठरवणार आहे. मतदार याद्या तपासून घ्या. महाराष्ट्राने एक वज्रमूठ आवळली आहे. मते चोरण्याचा प्रयत्न केल्या त्यांच्या टाळक्यात मूठ टाकू, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दुबार मतदारांना ठोकून काढा: राज ठाकरे
आजचा मोर्चा राग, ताकद दाखविण्याचा आहे. दिल्लीपर्यंत समजावण्याचा आणि समजावून सांगण्याचा आहे. आज शेतकरी कामगार पक्षासह राष्ट्रवादी, शिवसेना असे अनेक पक्षातील नेते मंडळी, पदाधिकारी मोठ्या ताकदीने मोर्चात सामील झाले आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटीलदेखील या मोर्चात सहभागी झाले आहेत. दुबार मतदार यादी आहे, असे अनेकजण सांगत असताना निवडणुका घेण्याची घाई का केली जाते, असा संताप राज ठाकरे यांनी व्यक्त केला. पुढे ते म्हणाले की, दुबार मतदार याद्या साफ करा, त्यानंतर पारदर्शक याद्या तयार केल्यावर निवडणुका घ्या. यश कोणाला आणि अपयश कोणाला हे उघड होईल. सर्व लपूनछपून काम चालू आहे. कल्याण, मुरबाड भिवंडी येथील साडेचार हजार मतदार आहेत. त्यांनी मलबार हिल मतदार संघातदेखील केले आहे. महाराष्ट्रात लाखो मतदार या मतदानासाठी वापरले गेले आहेत. नागरिकांनी मतदार याद्या तपासून घ्या. दुबार मतदार आल्या, त्यांना चोप द्या. तरच त्यांचा कारभार वठणीवर येईल. रांगेत उभे राहून मतदान करणाऱ्या मतदारांचा अपमान केला जात आहे, अशी घणाघाती टीका राज ठाकरे यांनी सरकारसह निवडणूक आयोगावर केली.
