जनआक्रोशाने प्रशासनाला जाग

महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू
| उरण | वार्ताहर |

अवघ्या पाच दिवसांवर गणेशोत्सव आला आहे. प्रत्येकाच्या घरी लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. परंतु, ज्या मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणवासी बाप्पाला घेऊन आपल्या घरी जात असतात, त्या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले होते. मात्र, पेण पत्रकार, सह्याद्री प्रतिष्ठान व सोबती संस्थेने पुकारलेल्या जनआक्रोश आंदोलनाने प्रशासनाला जाग आली असून, मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर येथील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले असून, या उपक्रमाला उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळत आहे.

काही वर्षे दुरवस्थेच्या गर्तेत अडकलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची व्यथा, वनवास काही केल्या संपत नाही. दरम्यान, दरवर्षी कोकणात गौरी-गणपती सणासाठी चाकरमान्यांना या खड्डेमय मार्गावरूनच प्रवास करावा लागतो. कोकणवासियांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणामार्फत हे खड्डे तातडीने बुजवणं गरजेचं होतं. मात्र, कासू ते इंदापूर हा 42 किलोमीटरचा रस्ता उच्च न्यायालयात न्याय प्रविष्ठ असल्यामुळे हे काम बरेच महिने रखडले गेले. त्यामुळे प्रवाशांना या महामार्गावरील खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. तरीही 1 जुलैपासून आत्तापर्यंत जेसीबी व इतर मशीनरी वापरून तात्पुरती डागडुजी सुरू होती. मात्र, जनतेला नाहक या खड्ड्यांना सामोरे जावे लागत असल्याची दखल पेण पत्रकार, सह्याद्री प्रतिष्ठान व सोबती संस्था यांनी घेऊन येत्या 26 ऑगस्टला पेण महामार्गावर स्वखर्चाने व श्रमदान करून खड्डे भरण्यासाठी जनआक्रोश आंदोलन पुकारला आहे. याच जनआक्रोश आंदोलनाने प्रशासनाने जाग येऊन महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे. आजपर्यंत अंदाजे पेण ते नागोठणे व भिरा फाटा ते इंदापूरपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे.

जन आक्रोश आंदोलनामुळेच खर्‍या अर्थाने प्रशासन नमले असून, त्यांनी सदर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केल्याचे निदर्शनात आले असून, त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल.

– समीर म्हात्रे, उपाध्यक्षख् सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य

प्रशासनाने योग्य पद्धतीने मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वच्या सर्व खड्डे भरले नाहीत, तर येत्या 26 ऑगस्ट रोजी कोकणातील गणेशभक्तांसाठी आम्ही राहिलेले खड्डे स्वखर्चाने व श्रमदानातून भरणार.

– मंगेश नेने, जनआक्रोश आंदोलन


डागडुजीसाठी ठेकेदारांची नियुक्ती
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पळस्पे ते इंदापूर रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामाचे आदेश दिले असून, यासाठी मे.रामेश्‍वर कन्स्ट्रक्शनचे राजू पिचिका, मे.जे.एम.म्हात्रे, मे.के.एन.घरत, मे.व्ही.एस.पाटील, मे.झेनिथ कन्स्ट्रक्शन या पाच ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यावर डांबर, खडी, सिमेंट काँक्रिट टाकून हे खड्डे बुजवले जाणार आहेत

Exit mobile version