श्रीवर्धन शहरातील स्वच्छतागृहे अद्यापही बंदच

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

श्रीवर्धन मध्ये भारत स्वच्छता अभियाना मधून अद्ययावत अशी शौचालय, स्वच्छतागृह बांधण्यात आली आहेत. मात्र, या शौचालयांचे उद्घाटन होऊन देखील नगर परिषदेने शौचालय सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारची कारवाई सुरू करण्यात आलेली नाही. मात्र, या ठिकाणचा विद्युत पुरवठा सुरू असून, रात्रीच्या वेळी केवळ झगमगाट या ठिकाणी दिसून येतो.

श्रीवर्धन शहरात सी. एस. आर. फंडातून बसवण्यात आलेले पथदिवे देखील सुरुवातीला सोलर ऊर्जेवर चालवण्यात येतील असे सांगण्यात आले. परंतु, प्रत्यक्षात हे सर्व दिवे महावितरणच्या विजेवरतीच सुरू आहेत. श्रीवर्धन मुख्याधिकाऱ्यांना किंवा या ठिकाणी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना अनेक वेळा आठवण करून सुद्धा या ठिकाणी कोणत्याही प्रकारे ही शौचालय सुरू करण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नसल्याबद्दल नागरिकांमधून खेद व्यक्त करण्यात येत आहे. शौचालयाला कायम टाळे ठोकलेले पाहायला मिळते. या ठिकाणी येणारे अनेक पर्यटक शौचालय किंवा आंघोळ करण्यासाठी अनेक रिसॉर्टमध्ये चौकशी करत असतात. परंतु, श्रीवर्धन नगर परिषदेचे निद्रिस्त प्रशासन या कोणत्याही गोष्टीकडे केव्हाही लक्ष देताना पाहायला मिळत नाही.

Exit mobile version