रोगराई पसरण्याची शक्यता
| रत्नागिरी | प्रतिनिधी |
संगमेश्वर तालुक्यातील उमरे येथील एका सार्वजनिक विहिरीचे पाणी दूषित झाले असून ते प्यायल्याने गावात पुन्हा रोगराई पसरण्याची शक्यता आहे.
उमरे या गावात काही वर्षांपूर्वी पाणीटंचाईच्या काळात बौद्धवाडीतील बहुतांश लोकांना अशुद्ध पाण्यामुळे विषबाधा झाली होती. त्याचीच पुनरावृत्ती यावर्षीही होताना दिसत आहे. गावातील बाईतवाडीजवळ असणाऱ्या विहिरीतील पाणी प्यायल्यामुळे तेथे कामासाठी आलेल्या सावंत कुटुंबियांना उलटी जुलाब सुरू झाले. सोबत आणखी कामगारांना त्रास होताच त्यांनी संगमेश्वर आणि रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयात धाव घेतली. सुदैवाने सध्या सर्वांची प्रकृती ठीक आहे.
बाईतवाडीतील या सार्वजनिक विहिरीचे पाणी दूषित झाल्याने हा प्रकार घडत असण्याची शक्यता असून ग्रामसेवक रवींद्र दिलीपराव ढवळे आणि सरपंच मोहिते यांना वेळोवेळी कळवूनही त्यांनी त्याची दखल घेतलेली नाही. गावात पाणीटंचाई असली, तरी बाईतवाडीतील या विहिरीत मुबलक पाणीसाठा आहे. मात्र, ही विहीर दुर्लक्षित राहत आहे. या विहिरीतील पाणीसाठा शुद्ध करण्याची आवश्यकता आहे. शुद्धीकरण केल्यास मोठ्या वस्तीला चांगला पाणीपुरवठा होऊ शकेल. अन्यथा नागरिकांना विषबाधा होण्याची शक्यता असून ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.






