‘सावळ्या विठलाच्या देशात’ पुस्तकाचे प्रकाशन

| अलिबाग | प्रतिनिधी |
वर्षा चंद्रशेखर कुवळेकर लिखित ‌‘ सावळ्या विठ्ठलाच्या देशात ‘या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी वरसोली येथील विठ्ठल मंदिराच्या सभागृहात पार पडला. माजी जिल्हाधिकारी तथा उर्दू व मराठी गझलकार दिलीप पांढरपट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षा सुजाता पाटील,कमळ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष गिरीश तुळपुळे, लेखिका वर्षा कुवळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पल्लवी तुळपुळे तर आभार निवेदिता वाखारकर यांनी व्यक्त केले.

वर्षा कुवळेकर यांचा मुलगा केनिया देशामध्ये नोकरी व्यवसायानिमित्त असल्याने त्यांना केनिया देशाच्या राजधानीत नैराबी येथे जाण्याची संधी मिळाली. दहा महिने त्यांनी त्याठिकाणी वास्तव्य केले. या कालावधीत त्यांची अनेकांसोबत ओळख झाली. वेगवेगळ्या देशातील नागरिकांसोबत संवाद झाला.

नोकरी व्यवसायानिमित्त या देशात भारतीय लाखोच्या संख्येने असल्याने भारतीय नागरिकांसोबतही ओळख झाली. याबाबतचे अनुभव त्यांनी सोशल मिडीयामार्फत व्हायरल केले. त्यांच्या या लिखाणाला सोशल मिडियातून चांगला प्रतिसाद मिळाला. अनेकांनी त्यांना पुस्तक तयार करण्यास सांगितले. त्यानुसार, त्यांनी डिसेंबरमध्ये भारतात आल्यावर पुस्तक लिहण्यास सुरुवात केली. या पुस्तकाला धनश्री लेले यांची प्रस्तावना आहे. ज्यापध्दतीने नैरोबी दिसली, समजली, भावली त्या पध्दतीने कुवळेकर यांनी या पुस्तकातून वर्णन केले आहे.

पुस्तकासोबत पोस्टकार्ड
वर्षा कुवळेकर यांच्या ‌‘सावळ्या विठलाच्या देशात’ या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर ज्यांना पुस्तके देण्यात आली, त्यांना पुस्तकासोबत पोस्टकार्डही वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

Exit mobile version