मुंबई | प्रतिनिधी |
जेष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते प्रा. डॉ. संजय हिराजी खैरे यांच्या ‘गोधडी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन काल रविंद्र नाट्यमंदिर येथे संपन्न झाले. या वेळी त्यांनी गोधडी या काव्यसंग्रहातील प्रेम कवितांवर मार्मिक भाष्य केले. प्रेम हा भाव केवळ माणसातच नसून तो पशुपक्ष्यांमध्येही दिसतो. मात्र त्याचे विकृतीकरण हे केवळ मानवानेच केले. तरुण वयात प्रेम करणे हे स्वाभाविक आहे. उलट या वयात प्रेम न करणे हा मी गुन्हा मानतो, मात्र समोरची मुलगी आपल्यावर प्रेम करत नाही हे पाहून तिच्या चेहर्यावर अॅसिड फेकणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे, असा शब्दात डॉ. मुणगेकर यांनी प्रेमाच्या नावाने होत असलेल्या विकृतीकरणावर खेद व्यक्त केला.
डॉ. खैरे हे अतिशय भावनाप्रधान कवी आहेत, हे त्यांच्या कविता वाचून सहज लक्षात येते. प्रत्येक कविता ही त्यांच्या भावना शब्दांत गुंफीत आलेली दिसते. गोधडी ही आपल्या आयुष्यात आपल्याला सुखाची झोप येत असताना प्रेमाची ऊब देत असते. गोधडी विविध रंगाच्या कप्प्याकप्प्याने तयार झालेली असते.अगदी तशीच डॉ. खैरे यांची गोधडी तयार झालेली आहे. या गोधडीला एक पहिला कप्पा प्रेमाचा लावलेला आहे. या कप्प्यात आपल्याला प्रेम भावना सहज पाहायला मिळतात, असेही डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी म्हटले आहे.
या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिका, आयदानकार उर्मिला पवार, साहित्यिका आणि अभ्यासक प्रा. आशालता कांबळे, मसोनबाकारफ रमाकांत जाधव, पत्रकार सुनील तांबे यांनीही आपले विचार व्यक्त केले.
कवी खैरे यांच्या ‘गोधडी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन
