गुजरा हुआ जमाना पुस्तकाचे प्रकाशन

शरद कोरडे यांना घेतला कलाकारांच्या जीवनाचा वेध

| अलिबाग | प्रतिनिधी |

पुस्तके असली तर संस्कृती टिकते. पुस्तके हे संस्कृतीचे केंद्र असते. पुस्तक हे संस्कृतीचे मस्तक आहे. हे मस्तक उन्नत करण्याचे कार्य लेखक, वाचक, ग्रंथालये करत असतात. शरद कोरडे यांचेही पुस्तक चित्रपटसंस्कृतीचे दर्शन घडविणारे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक-गझलकार डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले. प्रतिक प्रकाशन, पुणे प्रकाशित, शरद कोरडे लिखित हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्ण युगावर आपला ठसा उमटविणाऱ्या निवडक कलाकारांच्या जीवनाचा वेध घेणाऱ्या गुजरा हुआ जमाना या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी (दि. 10) भारती तरे सभागृह, श्रीबाग येथे रायगडचे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार, उद्योजक गजेंद्र दळी, साहित्यिक-पत्रकार उमाजी केळुसकर, चारुशिला शरद कोरडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी असलेल्या डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी शरद कोरडे यांच्या पुस्तकाबद्दल कौतुगोद्गार काढून त्यांना शुभेच्छा दिल्या.

जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी यावेळी बोलताना शरद कोरडे यांनी मगुजरा हुआ जमानाफ हे पुस्तक लिहून जुन्या काळातील कलाकारांची नव्याने ओळख करुन दिली असल्याचे सांगितले. अजित पवार, उमाजी केळुसकर, द्वारकानाथ नाईक यांनीही आपल्या भाषणातून शरद कोरडे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. तर लेखक शरद कोरडे यांनी आपण पाहिलेल्या, वाचलेल्या चित्रपट कलाकारांवर आपण हे पुस्तक लिहिले असल्याचे सांगीतले. या कार्यक्रमाचे सुरेख निवेदन ॲड. के.डी. पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी सखाराम पवार, द्वारकानाथ नाईक, भारती दीनानाथ तरे, नागेश कुळकर्णी, प्रकाश नागू म्हात्रे, श्रीरंग घरत, दिलीप शिंदे, आर.के. घरत, सुभाष क्षिरे, पुरुषोत्तम साठे, अनंत देवघरकर, मेघना कुलकर्णी, मानसी चेऊलकर, यशवंत थळे, दिलीप देवळेकर आदी उपस्थित होते.

Exit mobile version