पुनाडे धरणाने गाठला तळ

| उरण | वार्ताहर |

पुनाडे धरणाची पाणीपातळी झपाट्याने घसरत आहे. मार्च महिन्यात सदर धरणातील पाणी 25 ते 30 फूट खाली गेल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे उरण पूर्व विभागातील आठ गावांची तहान भागविणारे पुनाडे धरण या वर्षीही तळ गाठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सातत्याने या धरणाकडे होत असलेले प्रशासनाचे दुर्लक्ष या गोष्टीला जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने त्यात लक्ष घालावे, अशी मागणी उरण पूर्व विभागातील आठ गावांतील जनता विशेष करून महिला वर्ग करीत आहे.

शेतीच्या सिंचनासाठी लघु पाटबंधारे विभागाने उरण तालुक्यातील पुनाडे ग्रामपंचायत हद्दीत हे धरण (बंधारा) 1991 साली बांधले; मात्र, या धरणाचे पाणी सिंचनासाठी उपयोगात येत नसल्यामुळे उरण पूर्व भागातील टंचाईग्रस्त आठ गावांनी या धरणाचे पाणी पिण्यासाठी वापरण्याची योजना राबविली. तेव्हापासून 1.75 एमसीएम एवढी पाण्याची क्षमता असलेले पुनाडे धरण उरणच्या पूर्व विभागातील पुनाडे, वशेणी, सारडे, पिरकोण, पाले, आवरे, गोवठणे, पाणदिवे या आठ गावांची तहान भागवत आहे.

मात्र, यावर्षी कोकण किनारपट्टीवरील उरण सारख्या तालुक्यात ही पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणात पाणीसाठा कमी प्रमाणात झाला आहे.त्यातच धरणातून होणारे पाण्याचे लिकेज, वाढती उष्णता यामुळे धरणातील पाणी 25 ते 30 फूट खाली गेल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. एकंदरीत प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे उरण पुर्व विभागातील आठ गावांची तहान भागविणारे पुनाडे धरण तळ गाठण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी संबंधित प्रशासनाने पुनाडे धरणात पाणीसाठा पावसाळ्यात कशा प्रकारे वाढेल यासाठी उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी या परिसरातील महिला वर्ग करीत आहेत.

Exit mobile version