15 लाखांचा निधी केलाय खर्च
कारंजे, बोटिंग, विजेचे पथदिव्यांची कामे अर्धवट
। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ ग्रामपंचायतच्या मालकीच्या राजमाता जिजामाता तलावाचे काही दिवसांपूर्वी सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्या तलावाचे 15 लाख खर्चून नुकतेच सुशोभीकरण करण्यात आले होते, त्या निधीमधून तलावातील बंद असलेले कारंजे सुरु झाले नाही आणि बंद असलेली बोटिंग देखील सुरु झाली नाही. दरम्यान, याच राजमाता जिजामाता तलावाचे 2017 मध्ये डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून सुशोभीकरण करण्यात आले होते. ते कोणते सुशोभीकरण होते? असा प्रश्न देखील उपस्थित होत असून नुकत्याच 15 लाख खर्चून केलेल्या सुशोभिकरण कामानंतर देखील तलावातील कामे अर्धवटच आहेत? तर मग नेरळ ग्रामपंचायत अशा कामाचे बिल अदा करणार काय? याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
कर्जत तालुक्यात नेरळ ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम समजली जाते. या ग्रामपंचायत मधील राजमाता जिजामाता तलावाचे सुशोभीकरण काही वर्षांपूर्वी नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिष्ठानकडून करण्यात आले होते.त्यावेळी नेरळकरांना चालण्यासाठी पेव्हर ब्लॉकचे रस्ते, विजेचे पथदिवे, मनोरंजनासाठी बोटिंग आणि बसण्यासाठी बाकडे आदी व्यवस्था करण्यात आली होती. मात्र नेरळ ग्रामपंचायत कडून तेथे असलेली उपकरणे कायमस्वरूपी सुस्थितीत राहावी यासाठी कोणत्याही खबरदारी घेतली गेली नाही आणि म्हणून कारंजे बंद पडले आहेत, बोटिंग देखील बंद आहेत तर पथदिव्यांवर सर्व भागात दिवे नाहीत. स्थानिकांच्या मनोरंजनासाठी बनविण्यात आलेल्या तलावात असलेले कारंजे मागील वर्षांपासून बंद आहे. धरणाच्या परिसरात असलेले विजेचे दिवे आहेत त्यातील अर्धे दिवे बंद असून मागील काही दिवसांपूर्वी नेरळ ग्रामपंचायतच्या वीज विभागाने त्या दिव्यांवर नवीन दिवे लावले आहेत. तरी देखील मागील सत्ताधारी मंडळाच्या कार्यकाळात वेगळ्या आकाराचे बनवलेले पथदिवे यांच्या नव्याने कोणतीही वाढ झालेली नाही. त्यामुळे 15 लाखाच्या सुशोभीकरण कामात किती पथदिवे बसविले आणि किती खांबांवर नवीन दिवे लावून राजमाता जिजामाता तलाव प्रकाशमान केला. याबद्दल देखील संभ्रमावस्था आहे. त्यामुळे या तलावाचे सुशोभीकरण काम करताना ठेकेदाराने केलेल्या कामाचं चौकशी करण्याची मागणी पुढे येत आहे.
15 लाख रुपयांचा निधी तलावाचे सुशोभीकरण कामासाठी मंजूर झाले होते असे असताना तलावातील कारंजे यांची सुधारणा करण्यात आली नाही आणि ते पुन्हा सुरु देखील झाले नाहीत. त्याचवेळी बंद असलेल्या बोटींची दुरुस्ती झाली नाही आणि त्या बोटी तलावात फिरताना देखील दिसत नाहीत. हे लक्षात घेता नेरळ ग्रामपंचायत मधील तलावाचे सुशोभीकरण ज्या 15 लाख रुपयांच्या निधीमधून नक्की काय करण्यात आले? याबद्दल उलटसुलट चर्चा सुरु आहे.
नागरी सुविधा मधून मंजूर झालेल्या कामाचे अंदाजपत्रक 15 लाखांचे असून अंदाजपत्रकाप्रमाणे कामे झाली आहेत. अंदाजपत्रक नेरळ ग्रामपंचायतीकडे असून संबंधित कामाचा निधी वितरित करण्याचे अधिकार नेरळ ग्रामपंचायतीला आहेत.
गुलाबराव देशमुख, शाखा अभियंता कर्जत पंचायत समिती