सोलापुर स्मॅशर्सचा एक धावाने पराभव
| पुणे | प्रतिनिधी |
महाराष्ट्र क्रिकेट संघटना आयोजित अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये पुणे वॉरियर्स संघाने जेतेपद पटकावले आहे. शनिवारी (दि.14) झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात त्यांनी सोलापूर स्मॅशर्सचा अवघ्या एका धावेने पराभव केला आहे. याआधीच्या साखळी फेरीत पुणे वॉरियर्स संघाने दोन्ही लढतीत सोलापूर स्मॅशर्स संघावर विजय मिळवला होता. या विजयाबरोबरच पुणे वॉरियर्स संघाने आपली अपराजित राहण्याची मालिका कायम ठेवत विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेतील अंतिम फेरीच्या सुरुवातीला पावसाच्या व्यत्ययामुळे सामना प्रत्येकी 18 षटकांचा खेळविण्यात आला. सोलापूर स्मॅशर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पुणे संघाची सलामीवीर खुशी मुल्ला 17 धावा काढून तंबूत परतली. सुहानी कहांडळ देखील 20 धावा काढून बाद झाली. त्यानंतर अक्षया जाधवने 29 धावा काढून संघाची धावगती वाढवली. तसेच, कर्णधार अनुजा पाटीलने नाबाद 30 धावांची संयमी खेळी केली. अनुजाने श्वेता मानेच्या समवेत 53 धावांची भागीदारी करून संघाला 18 षटकांत 6 बाद 129 अशी समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. सोलापूर स्मॅशर्सकडून स्वांजली मुळे आणि आचल अगरवाल यांनी प्रत्येकी दोन बळी घेत सुरेख गोलंदाजी केली.
पुण्याने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना सोलापूरची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ईश्वरी अवसरे 8 धावांवर तंबूत परतली. त्यानंतर स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या कर्णधार तेजल हसबनीसने आक्रमक सुरुवात केली. परंतु, ती चोरटी धाव घेत असताना 22 धावांवर पायचित झाली. मुक्ता मगरेने एकाबाजूने संघाची धुरा सांभाळताना 40 धावांची खेळी केली. सोलापूर स्मॅशर्स संघाला विजयासाठी 6 चेंडूत 9 धावांची आवश्यकता होती. पहिल्या चेंडूवर दामिनी बनकरने एक धाव घेतली. त्यानंतर शाल्मलीने चौकार मारत विजयाचे लक्ष्य आणखी कमी केली. मात्र, चौथ्या चेंडूवर शाल्मली झेलबाद झाली आणि सामन्यात रंगत आणली. त्यानंतर 1 चेंडूत 2 धावांची गरज असताना स्वांजली मुळे धावबाद झाली आणि सोलापूर स्मॅशर्स संघाला 18 षटकांत 6 बाद 128 धावाच करता आल्या. त्यामुळे पुणे वॉरियर्स संघाने केवळ एक धावेने पहिल्या अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीगवर आपले नाव कोरले आहे.
या स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व 20 लाख रुपये, तर उपविजेत्या संघाला करंडक व 10 लाख रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमसीएचे मानद सचिव ॲड. कमलेश पिसाळ, सहसचिव संतोष बोबडे, एमपीएलचे चेअरमन सचिन मुळे, अपेक्स कौन्सिल सदस्य शुभेंद्र भांडारकर, सुहास पटवर्धन, राजू काणे, सुनील मुथा, विनायक द्रविड, सुशील शेवाळे, रणजीत खिरीड, केशव वझे, अजय देशमुख, कल्पना तापीकर, सीईओ अजिंक्य जोशी आदींसह सर्व संघमालक, सर्व जिल्हा संघटनेचे सदस्य, क्रीडा, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
