वेद वॉरियर्स ठरला मानकरी
रुद्रम चॅलेंजर्सला उपविजेतेपद
| चौल | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील देवघर येथे रविवार, दि. 6 मार्च रोजी पार पडलेल्या देवघर प्रीमियर लीगचा विजेता ठरला परिष म्हात्रे यांचा वेद वॉरियर्स संघ. अंतिम सामन्यात या संघाने मयूर घरत यांच्या रुद्रम चॅलेंजर्सचा पराभव करुन पहिल्यावहिल्या चषकावर दिमाखात नाव कोरले. गावातील तरुण पिढीमध्ये एकोपा व एकमेकांबद्दल जिव्हाळा राहावा, यासाठी अलिबाग पंचायत समितीचे माजी उपसभापती संदीप घरत यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा भरविण्यात आली होती.

स्पर्धेचे बक्षीस वितरण संदीप घरत आणि प्रमोद घरत यांच्या हस्ते करण्यात आले. आयपीएलच्या धर्तीवर पार पडलेल्या या स्पर्धेत संदीप घरत (ध्रुव फायटर्स), प्रमोद घरत (श्री गणेश चॅलेंजर्स), मयूर घरत (रुद्रम चॅलेंजर्स), सचिन आमरे (रिया टायगर्स), परिश म्हात्रे (वेद वॉरियर्स), आकीब दावीलकर (आकीब वॉरियर्स) हे संघ सहभागी झाले होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विघ्नहर्ता मित्र मंडळ देवघरच्या पदाधिकार्यांनी मेहनत घेतली.