राजस्थानविरुद्ध पंजाबच ‘किंग’

अटीतटीच्या लढतीत पाच धावांनी पराभव

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्सचा पराभव करून आयपीएल 2023 मध्ये सलग दुसरा विजय मिळवला. गुवाहाटी येथील बारसापारा स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 197 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थानचा संघ केवळ 192 धावा करू शकला. त्यामुळे त्यांना पाच धावांनी विजय मिळता आला. या सामन्यात पंजाबकडून गोलंदाजीत नॅथन एलिसने सर्वाधिक चार बळी घेतले.

या सामन्यात 198 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रविचंद्रन अश्‍विनला राजस्थान रॉयल्सच्या सलामीला यशस्वी जैस्वालसह मैदानात पाठवण्यात आले. यशस्वी जैस्वालने आपल्या डावातील पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला, मात्र त्यानंतर 8 चेंडूत 11 धावा काढून तो अर्शदीपचा बळी ठरला. यानंतर फलंदाजीला आलेल्या जोस बटलरने अश्‍विनसोबत वेगाने धावा करण्यास सुरुवात केली. राजस्थान संघाला 26 धावांवर दुसरा धक्का अश्‍विनच्या रूपाने बसला. जो खाते न उघडता तंबूत परतला. यानंतर बटलर आणि सॅमसनमध्ये तिसर्‍या विकेटसाठी 14 चेंडूत 31 धावांची भागीदारी झाली. राजस्थानला 57 धावांवर तिसरा मोठा धक्का जोस बटलरच्या रूपाने बसला, जो 19च्या वैयक्तिक धावांवर नॅथन एलिसचा बळी ठरला. कर्णधार संजू सॅमसनने देवदत्त पडिकलसह धावसंख्या पुढे नेली, त्याने 25 चेंडूत 42 धावांची शानदार खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला. राजस्थान संघाने 124 धावांपर्यंत आपले 6 महत्त्वाचे गडी गमावले होते. दरम्यान शिमरॉन हेटमायरने संघाला विजय मिळवून देण्यासाठी वेगवान धावा करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोही 18 चेंडूत 36 धावांची झटपट खेळी करत तंबूत परतला. त्यानंतर ध्रुव जुरेल 15 चेंडूंत 32 धावांवर नाबाद राहिला. अशा प्रकारे राजस्थान संघाला या सामन्यात पाच धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात पंजाबकडून नॅथन एलिसने 4 तर अर्शदीप सिंगने 2 बळी घेतले.

या सामन्यात शेवटपर्यंत फलंदाजी करताना कर्णधार शिखर धवनने 56 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 86 धावांची उत्कृष्ट खेळी साकारली. पंजाब संघाला 20 षटकांत 4 गडी गमावून 197 धावा करता आल्या. राजस्थानकडून सामन्यात जेसन होल्डर 2 तर रविचंद्रन अश्‍विन आणि युजवेंद्र चहल यांना 1-1 बळी घेता आला.

Exit mobile version