चेन्नईविरुद्ध पंजाबच ‘सुपरकिंग’

अखेरच्या चेंडूवर मिळविला विजय

| चेन्नई | वृत्तसंस्था |

पंजाब किंग्सने रविवारी आयपीएलमधील लढतीत चेन्नई सुपरकिंग्स संघावर अखेरच्या चेंडूवर रोमहर्षक विजय मिळवला. सिकंदर रझाने अखेरच्या चेंडूवर विजयासाठी तीन धावांची गरज असताना मथीशा पथिरानाच्या गोलंदाजीवर दमदार फटका मारत पंजाब किंग्सला विजय मिळवून दिला. पंजाब किंग्सने मोसमातील पाचवा विजय साकारला. चेन्नई सुपरकिंग्सला चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

चेन्नईकडून पंजाबसमोर 201 धावांचे आव्हान ठेवण्यात आले. प्रभसिमरन सिंग व कर्णधार शिखर धवन या सलामी जोडीने 50 धावांची भागीदारी रचत आश्‍वासक सुरुवात करून दिली. तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर धवन 28 धावांवर बाद झाला. त्यानंतर रवींद्र जडेजाने प्रभसिमरन (42 धावा) व अथर्व तायडे (13 धावा) यांना बाद करत पंजाबला बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, याआधी चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डेव्होन कॉनवे – ऋतुराज गायकवाड या सलामी जोडीने याही लढतीत आपला दमदार फॉर्म कायम राखला. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 86 धावांची शानदार भागीदारी रचली. सिकंदर रझाच्या गोलंदाजीवर ऋतुराज 37 धावांवर यष्टिरक्षक जितेश शर्माकरवी यष्टिचीत झाला.

कॉनवे याने आपली झंझावाती खेळी सुरूच ठेवली. त्याला मोईन अली (10 धावा) व रवींद्र जडेजा (12 धावा) यांनी साथ दिली. कॉनवे याने 52 चेंडूंमध्ये 16 नेत्रदीपक चौकार व एका षटकाराच्या साह्याने नाबाद 92 धावांची खेळी साकारली.

पंजाबची अवस्था 3 बाद 94 धावा अशी असताना लियाम लिव्हिंगस्टोन व सॅम करन या जोडीने 57 धावांची भागीदारी करताना पंजाबच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या. ही जोडी आणखी खतरनाक होणार असे वाटत असतानाच तुषारच्या गोलंदाजीवर लिव्हिंगस्टोन 40 धावांवर बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 1 चौकार व 4 षटकार मारले. पथिरानाने करनला 29 धावांवर बाद करत पंजाबला धक्का दिला. अखेर रझा (नाबाद 13 धावा) व शाहरूख खान (नाबाद 2 धावा) यांनी पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Exit mobile version