| पंजाब | वृत्तसंस्था |
दमदार सांघिक प्रदर्शनासह यंदाच्या आयपीएल स्पर्धेत पंजाब किंग्ज संघाने सलग सात लढती जिंकल्या. प्लेऑफ प्रवेशासाठी त्यांना उर्वरित सात लढतीत केवळ दोन विजय मिळवणं आवश्यक होतं. पंजाबसाठी प्लेऑफ प्रवेश औपचारिकता मानला जात होता. ऐन भरात असतानाच पंजाबची गाडी रुळावरून घसरली. एक दोन नव्हे तर सलग सहा लढतीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणारा पंजाबचा संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार होता. मात्र सहा पराभवांनी पंजाबची लयच हरपली. मुंबई इंडियन्सने राजस्थानला नमवलं असतं तर पंजाबचा प्लेऑफ प्रवेश पक्का झाला असता पण नियतीच्या मनात वेगळंच काही होतं. रविवारी राजस्थानच्या विजयासह पंजाबचं आव्हान संपुष्टात आलं.
भरधाव निघालेला विजयरथ गाळात रुतावा अशी पंजाबची गत झाली. सलग 19 हंगाम खेळूनही पंजाबचा संघ जेतेपदाविनाच परतणार आहे. कॅचेस विन मॅचेस अशी क्रिकेटमधली जुनी म्हण आहे. पंजाबला या उक्तीचा चांगलाच प्रत्यय घडला. झेल सोडण्याबाबत पंजाब किंग्ज संघाने कहर केला. उडालेल्या 56 झेलांपैकी 16 झेल त्यांना टिपता आले नाहीत. फलंदाजांचं वर्चस्व राहिलेल्या या स्पर्धेत झेल सुटणं हे जणू पातकच आहे. शशांक सिंह याने सर्वाधिक म्हणजे 5 झेल सोडले. यामुळेच हंगामात पंजाबची कॅचिंग एफिशियन्सी 71.43 एवढी राहिली. झेलच्या बरोबरीने पंजाबने स्टंपिंगच्या काही संधीही वाया दवडल्या. हेनरिच क्लासन आणि इशान किशनसारख्या जबरदस्त फॉर्मात असणाऱ्या खेळाडूंचे झेल सोडणं पंजाबला चांगलंच महागात पडलं. पंजाबच्या विदेशी खेळाडूंनाही झेल सोडण्याची लागण झाली.
युझवेंद्र चहल हा पंजाबचा प्रमुख फिरकीपटू आहे. यंदाच्या हंगामात चहलच्या गोलंदाजीवर झेल सुटले हे खरं पण त्याच्या गोलंदाजीतली धार कमी झाल्याचं स्पष्टपणे जाणवलं. 14 लढतीत चहलने 12 विकेट्स पटकावल्या. यंदाच्या हंगामात चहलच्या गोलंदाजीवर सहजपणे धावा लुटल्या गेल्या. पंजाबने फिरकीवर लक्ष दिलं नसल्याचंही आकडेवारी सांगते. डावखुरा फिरकीपटू हरप्रीत ब्रार यंदाच्या हंगामात केवळ दोनच सामने खेळला. दुसऱ्या सामन्यात त्याने विकेट्स पटकावत आपली उपयुक्तता सिद्ध केली. पंजाबच्या फिरकीपटूंनी फक्त 59 षटकं टाकली. यावरूनच फिरकी हा विषय त्यांनी ऑप्शनला टाकल्यासारखं जाणवलं. पंजाबच्या गोलंदाजांनी 9 वेळा 200पेक्षा जास्त धावा दिल्या. एका हंगामात एवढ्या धावा लूटू देण्याचा हा विक्रम आहे. अर्शदीप सिंग पंजाबच्या माऱ्याचा प्रमुख आहे पण यंदा तो पूर्णपणे भरकटलेला वाटला. टी 20 प्रकारात भरवशाचा गोलंदाज असलेल्या अर्शदीपला यंदाच्या हंगामात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. दक्षिण आफ्रिकेच्या मार्को यान्सनवर पंजाबने विश्वास ठेवला पण ना त्याला धावा रोखता आल्या ना विकेट्स पटकावता आल्या.
प्रियांश आर्यने हंगामाची सुरुवात झंझावाती केली मात्र सात लढतींनंतर प्रतिस्पर्धी गोलंदाजांनी प्रियांशचे कच्चे दुवे हेरले. मार्कस स्टॉइनस अनुभवी अष्टपैलू खेळाडू आहे. मात्र त्याचा अनुभव ना गोलंदाजीत कामी आला ना फलंदाजीत. कॉनलीने चांगली सुरुवात केली मात्र त्यानंतर त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आलं. नेहलला यंदा सूर गवसला नाही. वैयक्तिक कारणांमुळे अफगाणिस्तानच्या ओमरझाईला मायदेशी परतावं लागलं. याचा मोठा फटका पंजाबला बसला. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्ही आघाड्यांवर योगदान देणाऱ्या ओमरझाईला राखीव खेळाडूत बसवणं अनाकलनीय होतं.
स्वप्नांवर पडल पाणी
सलग सात विजयांनंतर पंजाबचा संघ बेसावध झाला. सलग सहा पराभवांचा सामना करावा लागला. उर्वरित 7 पैकी 2 सामने जिंकले की प्लेऑफमध्ये इतकं साधं समीकरण त्यांना वाटू लागलं. कोणत्याही धावसंख्येचा पाठलाग करू शकतो किंवा कितीही मोठी धावसंख्या उभारू शकतो हा फाजील आत्मविश्वास पंजाबच्या खेळात दिसू लागला.
दुर्देवाने पंजाबची कामगिरी घसरत असतानाच बाकी संघांनी चुकांतून शिकत पुनरागमन केलं. पंजाबच्या कच्च्या दुव्यांवर प्रहार करत प्रतिस्पर्धी संघ जिंकू लागले. रोरावत निघालेला पंजाबचा विजयरथ जो गाळात रुतला तो कायमचाच. श्रेयस अय्यर कर्णधार आणि मुख्य फलंदाज म्हणून चांगली कामगिरी करत असतानाही बाकी खेळाडूंची त्याला साथ लाभली नाही. श्रेयसचा मिडास टच पंजाबला प्लेऑफ्समध्ये नेणार असं चाहत्यांना वाटत होतं पण राजस्थानने त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरलं.
