आंबोली केंद्रावर 18 हजार क्विंटल भात खरेदी

बळीराजाची शासनाकडे बोनसची मागणी

| मुरुड जंजिरा | प्रतिनिधी |

मुरुड तालुक्यातील आंबोली येथील आदिती अ‍ॅग्रो खार अंबोली या हमीभाव भात खरेदी केंद्रावर आतापर्यंत 18 हजार क्विंटलची विक्रमी खरेदी करण्यात आली आहे. यंदा 2183 रुपये इतका भाताला हमी भाव राज्य शासनाच्या पणन विभागाकडून मिळाल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. तथापि यंदा वाढीव बोनस जाहीर करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.

मुरूड तालुक्यात एकूण 3 भातविक्री केंद्र असुन तालुक्यात खार आंबोली, बोर्ली-मांडला व तळेखार येथे भात हमीभाव केंद्र उघडण्यात आले आहेत. पूर्वी भाताची काढणी झाल्या नंतर खासगी व्यापारी अल्प मोबदल्यात भात खरेदी करत असत त्यामुळे भातशेतीचा व्यवसाय आतबट्ट्याचा होत असे. मिठागर, सावली, नांदले, उसरोली, टोकेखार, आगरदांडा, जमृतखार, हाफिजखार, उंडरगाव, वाणदे, जोसरांजण, शिघ्ने, नवीवाडी, नागशेत, वावडुंगी, वेळास्ते, आदाड, नांदगाव आदी गावांतून भात केंद्रावर खरीप हंगामाचा भात आणला जातो.

भात खरेदीचे आदेश पणन विभागाकडून लवकर प्राप्त झाले तरी प्रत्यक्ष भात खरेदीला डिसेंबर 2024 पासून सुरुवात झाली. भात खरेदी सुरू झाल्यापासून खासगी व्यापार्‍यांकडून होणारी आर्थिक फसवणूक टळली असून प्रति क्विंटल 2183 रुपये हमी भाव मिळत असल्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे शेतकर्‍यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा होत आहेत. गतवर्षाप्रमाणे यंदा सरकारने अद्याप बोनस जाहीर न केल्याची तक्रार उंडरगावचे शेतकरी महादेव नागोजी भोईट यांनी केली आहे.

तर भात शेतीला पेरणीपासून काढणीपर्यंत एकरी 15 ते 20 हजार रुपये खर्च करावा लागतो. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमुळे सामाईकरित्या शेतात माणसे राबायची, त्यामुळे भात शेती परवडत असे. आता मात्र मजुरांची समस्या भेडसावत असुन भात पेरणी ते काढणी पर्यंत करावा लागणार्‍या खर्चाची उत्पन्नातून जेमतेम तोंड मिळवणी होत असल्याची व्यथा शेतकरी वर्ग मांडत आहे. शासनाकडे भाताला वाढीव भाव व बोनस वाढवून मिळावा यासाठी खारआंबोलीचे माजी सरपंच मनोज कमाने, प्रभाकर धर्मा पाटील, अनिल कमाने, गणेश म्हात्रे, मदन भोईर आदींनी निवेदनही दिले आहे.कोकणातील सर्व आमदारांनी शेतकर्‍यांच्या हितासाठी शासनदरबारी हा प्रश्‍न मांडून वाढीव बोनस जाहीर करावा अशी विनंती केली आहे.

या संदर्भात के. बी ताटे पणन अधिकारी, रायगड यांना विचारले असता ते म्हणाले की, हमीभाव केंद्रावर भात विक्री करणार्‍या शेतकर्‍यांना बोनस द्यायचा कि नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांना सरसकट बोनस द्यायचा याचा शासन आदेश अद्याप प्राप्त झालेला नाही. गतवर्षी प्रति हेक्टर बोनस दिल्याची माहिती त्यांनी दिली.

Exit mobile version