खोटा शेतकरी दाखला वापरून जमिनीची खरेदी

आरोपीवर गुन्हा दाखल

| पेण | प्रतिनिधी |

वामन रामचंद्र माडये या मुंबईतील इसमाने पाटणोली येथील 223/0 सदरची जमीन खरेदी करताना तो स्वतः शेतकरी नसताना त्याने सदरच्या जमीन खरेदीसाठी सापोली येथील गट क्रमांक 60/0 या जमिनीचे मालक व शेतकरी असल्याचा सातबारा जोडला. सदरचा सातबारा हा सापोली, ता. पेण येथील युनूस अजिम खान, रा. खानमोहल्ला, ता. पेण यांच्याकडून 2011 मध्ये खरेदी केला. परंतु, ही जमीन खरेदी करतानादेखील वामन माडये यांनी पानसई, ता. माणगाव येथील 198/6 चा खोटा सातबारा जोडून आपण शेतकरी असल्याचा कांगावा केला. परंतु, खरं पाहता पानसई येथील 198/6 या सातबार्‍याशी वामन माडये यांचा संबंध नसताना खोटा सातबारा तयार करुन पेण येथील दोन ठिकाणी जमिनी खरेदी केल्या. त्याचप्रमाणे झोन दाखल्यामध्येदेखील वामन माडये यांनी फेरबदल केला. मूळ दाखल्यावर सूर्यकांत पोशा पाटील, रा. पाटणोली, ता. पेण यांच्या नावे असताना त्या दाखल्यावर नाव बदलून राजेंद्र रामचंद्र पाटील, रा. सागाव, ता. अलिबाग हे खोटे नाव नमूद करुन नावात बदल केला आहे. अशाप्रकारे पेण तालुक्यात सापोली, महाड तालुक्यात दासगाव येथे जमिनी खरेदी करताना दाभोली, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग अशा ठिकाणी खोट्या कागदपत्रांचा वापर करुन वामन माडये यांनी जमिनी खरेदी केल्याचे उघडकीस आले आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, पाटणोली येथील माधव नारायण शहाणे यांच्या कुटुंबाची जमीन कुळांना वगळून खरेदीखत केल्यानंतर कुळ सूर्यकांत पाटील यांनी झालेली फसवणूक उघडकीस आणली आहे. त्यानंतर पेण पोलीस ठाण्यात वामन रामचंद्र माडये व अमोल कामत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक तपास पेण पोलीस ठाणे करत आहे.

Exit mobile version