रायगडच्या काळ्या मातीत रुजणार जांभळा भात

प्रगतशील शेतकरी निलेश शिर्के यांचा प्रयोग
| पाली/बेणसे | धम्मशील सावंत |
सुधागड तालुका हे रायगडमध्ये भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते.औद्योगिकीकरण,नागरीकरणात जिल्ह्यातील भात लागवडीचे पीक घटत असले तरी अजूनही बहुंताशी भागात जया,सुवर्णा,कोमल,कर्जत,जोरदार आदी भातपीकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.त्यात आता जांभळ्या भाताची लागवडीचाही समावेश झाला आहे.रायगडच्या काळ्या आईच्या पोटात आता जांभळ्या भाताचे वाण रुजणार आहे.सुधागड तालुक्यातील प्रगतशील शेतकरी निलेश शिर्के यांनी कृषी विभागाच्या सहाय्याने आपल्या शेतात जांभळ्या भाताची लागवड केली आहे.

सुधागड तालुक्यातील पुई गावातील तरुण प्रगतशील शेतकरी निलेश शिर्के यांनी कृषी विभागाच्या सहाय्याने जांभळ्या भाताची यशस्वी लागवड केली आहे. नुकतीच या भाताच्या रोपांची लावणी देखील करण्यात आली आहे. सतत नवनवीन प्रयोग करून कृषी क्षेत्रात काही नाविन्यपूर्ण करण्यावर शिर्के भर देत असतात. निलेश शिर्के हे किसान सन्मान शेतकरी बचत गटाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्मा च्या विकेल ते पिकेल या योजने अंतर्गत जांभळ्या भाताची प्रात्यक्षिक म्हणून लागवड केली आहे. सदर भाताचे बीजोत्पादन करून पुढील वर्षी गटातील व इतर शेतकर्‍यांना देण्यात येणार आहे.

सुधागड कृषी विभाग यांच्याकडून या भाताचे वाण तसेच पीएसबी आणि आझाटोबॅक्टर हे जिवाणू संवर्धक उपलब्ध झाले आहेत. या पीक प्रात्यक्षिकासाठी तालुका कृषी अधिकारी जे. बी. झगड व कृषी सहाय्यक प्राजक्ता पाटील – काटकर यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभल.
निलेश शिर्के,प्रगतशील शेतकरी

Exit mobile version