नवघर अंगणवाडीत आढळला अजगर

| पेण | प्रतिनिधी |

पेण तालुक्यातील नवघर अंगणवाडी ही अंतोरा बंदराच्या खाडीवर असून पुराचे पाणी वारंवार या अंगणवाडीत शिरते. त्या पाण्याबरोबरचे सापजातीचे अनेक जनावरे या अंगणवाडीमध्ये शिरत असतात. त्यामुळे येथे काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकेसह मदतनीस व विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. नवघर अंगणवाडी सेविका पुनम पाटील आणि अंगणवाडी मदतनीस वैशाली कोळी या दररोज आपल्या जिवाशी खेळून अंगणवाडी उघडत असतात. त्यानंतर साफसफाई करूनच विद्यार्थ्यांना अंगणवाडीत घेतात. मंगळवारी (दि.9) रोजच्याप्रमाणे त्यांनी अंगणवाडी उघडली असता अंगणवाडीच्या स्वयंपाक घरात साप जातीचे पिल्लू आढळून आले. त्यानंतर सर्प मित्र दानिष शेंदोळे यांना बोलवल्यानंतर त्याने तो साप अजगर जातीचा असल्याचे सांगितले आणि त्याला पकडून सुरक्षितरित्या निसर्गाच्या आदिवासात सोडले. त्यामुळे वारंवार या अंगणवाडीत साप येत असल्याने अंगणवाडी कर्मचारी, विद्यार्थी व पालकांच्या मनात भिती निर्माण होत आहे. तरी या अंगणवाडीला योग्य ती उंची देऊन नव्याने बांधकाम करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

Exit mobile version