| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
ज्येष्ठ नागरिक संस्था, अलिबागची त्रैमासिक सभा येथील जनरल अरुणकुमार वैद्य माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात संस्थेचे अध्यक्ष ल.नी. नातू यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्ष नातू यांनी संस्थेचा कार्याचा आढावा घेऊन आर्थिक जमा खर्चाची माहिती सभेत दिली.
या सभेत सभासदांच्या लग्नास पन्नास वर्षे झाली आहेत व उभयता हयात आहेत, अशा जोडप्यांचा संस्थेतर्फे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर ज्या सभासदांचे वय 90 वर्षे, 80 वर्षे व 75 वर्षे पूर्ण झाले आहे, अशा सभासदांचा सन्मान श्रीफळ, शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. त्यात प्रामुख्याने गोपाळराव लिमये, हरिश्चंद्र लक्ष्मण कोळी यांचा वयाची 90 वर्षे पार केल्यामुळे सत्कार करण्यात आला. त्यानंतर 80 वर्षे पूर्ण केलेल्या सोळा सभासदांचा व 75 वर्षे पूर्ण केलेल्या 26 सभासदांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रतिवर्षी मागील तिमाही सभेनंतर त्या सभासदांचे वाढदिवस होते अशा सभासदांचाही श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे निवेदन बळवंत वालेकर, शरद कोरडे व नानासाहेब थोरात यांनी केले. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या कार्यकारिणी सभासदांनी खूप मेहनत घेतली. गजेंद्र दळी, उपाध्यक्ष प्रफुल राऊत, सचिव यशवंत थळे, डी.डी नाईक, दिलीप शिंदे, मेघना कुलकर्णी, शुभदा ठोसर, चारुशीला कोरडे, विलास डोळस, पुरुषोत्तम साठे यांनी सभेसाठी परीश्रम घेतले. या सभेत ज्यांचे सत्कार झाले अशा सभासदांनी देणगी म्हणून 32,240 रुपये संस्थेत दिले. शेवटी उपाध्यक्ष प्रफुल्ल राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानले व राष्ट्रगीत होऊन सभा संपन्न झाली.