प्रशासनाला निवेदन
| मुरूड | वार्ताहर |
मुरूड शहरातील वाहने पार्किंग व्यवस्था गंभीर बनली असून नाताळ आणि थर्टी फर्स्ट काळात हा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करण्याची तीव्र शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुरुड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पोलीस आणि नगरपालिकेला निवेदन सादर करण्यात आले.
मुरूड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे पार्किंग बाबत एक विशेष निवेदन मुरूड पोलीस निरीक्षक राहुल अतींग्रे, मुरूड नगरपरिषद चे प्रशासक पंकज भुसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर आणि शिष्टमंडळाने भेट घेऊन दिले आहे. थर्टीफर्स्ट च्या पार्श्वभूमीवर हाजारो पर्यटक आपापली वाहने घेऊन मुरूड समुद्रकिनारी येणार असून त्यावेळी पार्किंग नसल्यामुळे वाहने रस्त्यावर लावल्यास स्थानिक नागरिक, पर्यटक यांची मोठीच कुचंबणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गैरसोय आणि संभाव्य वादावादी टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना करावी, असे निवेदनात म्हटले आहे. या प्रसंगी मंगेश दांडेकर यांच्या समवेत सचिव विजय पैर, राष्ट्रवादी महिला अध्यक्षा मृणाल खोत, माजी नगरसेविका प्रमिला माळी, मनीष माळी, विजय भोय, नितीन पवार, आदेश भोईर, किरण नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते. सदर निवेदन नगरपरिषद मुख्याधिकारी पंकज भुसे यांना देखील देण्यात आले आहे.
थर्टीफर्स्ट च्या काळात आम्ही बसेसना बंदर मार्गावर प्रवेश देणार नसून पेड पार्किंगची सुविधा हिंदू बोर्डिंग, सर एस ए हायस्कुल येथे करण्यासाठी बोलणी सुरू आहे. येथे पार्किंग शक्य न झाल्यास समुद्रकिनारी वाळूवर पार्किंग करायचे की अन्यत्र करायचे हे ठरविले जाईल.
पंकज भुसे
प्रशासक
या संदर्भात बोलताना मंगेश दांडेकर यांनी सांगितले की, पार्किंगसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून शक्य तेवढी मदत आणि सहकार्य प्रशासनाला केली जाईल. पार्किंग समस्येमुळे मुरूडच्या पर्यटन विकासाला धोका पोहचणार नाही या साठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहणार आहोत, अशी माहिती मंगेश दांडेकर यांनी दिली. आधिक माहिती घेता बुधवार, गुरुवार पासून नगरपरिषद तर्फे पार्किंग बाबत नियोजन करण्याच्या हालचाली सुरू केल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी देखील कोंडी टाळण्यासाठी तयारी सुरू केली असून पार्किंग बाबत खबरदारी च्या उपाययोजनांची तयारी सुरू करण्यात आली आहे. शनिवार, रविवार असल्याने पर्यटकांचा पूर येण्याचे चित्र गुरुवारी दिसून आले.