केवळ नऊ दिवसांत 3,700 प्रवासी वाहतूक; 4.81 लाख महसुलाची नोंद
| माथेरान | प्रतिनिधी |
मुंबई, पुणे आणि परिसरातील नागरिकांसाठी माथेरान हे सर्वात जवळचे आणि सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. नेरळ-माथेरान टॉय ट्रेन जी 100 वर्षांहून अधिक जुनी आहे, ती भारतातील काही पर्वतीय रेल्वेंपैकी एक आहे.
2019 मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नेरळ-माथेरान ट्रॅक वाहून गेला होता. तेव्हापासून मध्य रेल्वे युद्धपातळीवर रेल्वेची पुनर्बांधणी आणि पुनर्स्थापना करीत आहे. नेरळ ते अमन लॉजपर्यंत पर्वतांना वळण देणारी नॅरोगेज लाईन अखेर तयार झाली आणि (दि.22) या मार्गावरील सेवा पुन्हा सुरू झाली. मिनीट्रेनच्या सेवेचे प्रवाशांनी अत्यंत आनंदात स्वागत केले असून, त्याला उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
दि. 22 ते 30 या कालावधीत व्हिस्टाडोममध्ये 229, प्रथम श्रेणीतील 378 आणि द्वितीय श्रेणीतील 3,091 अशा एकूण 3,698 व्यक्तींनी प्रवास करून रु.4,84,141 रुपयांच्या महसूलाची नोंद केली आहे. यामध्ये व्हिस्टाडोम तिकिटांच्या विक्रीतून 1,49,995 इतका महसूल समाविष्ट आहे, जो एकूण रकमेच्या जवळपास 31% आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे मिळाली आहे.
मध्य रेल्वे नियमितपणे अमन लॉज ते माथेरानदरम्यान प्रवाशांसाठी शटल सेवा सुरू असून, ही आकडेवारी या पर्यटन स्थळी येणार्या प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास उपलब्ध करून देण्यात रेल्वेची महत्त्वाची भूमिका दर्शवते. माथेरान हे ठिकाण केवळ एक प्रमुख पर्यटन स्थळच नाही तर निसर्गाच्या जवळ नेणारे ठिकाण म्हणूनही लोकप्रिय आहे. हे मिनिट्रेन ट्रेनमधील अविस्मरणीय राईडसह निसर्ग जवळून पाहण्याचा थरार अनुभवता येतो.
विस्टाडोम बोगीला पर्यटकांची पसंती
नेरळ-माथेरान मिनिट्रेन 22 ऑक्टोबरपासून पर्यटकांच्या सेवेत दाखल झाली आहे, तेव्हापासून विस्टाडोम बोगीत प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. पर्यटक बोगीत बसूनच 21 किलोमीटर अंतरामध्ये नागमोडी वळणे घेत निसर्गाचा मनमुराद आनंद घेता येतो.
नेरळ-माथेरान ही रेल्वे सेवा पर्यटकांसाठी सुरू झाली असून, पर्यटक आवर्जून या मिनिट्रेनचा अभूतपूर्व सफारीचा आनंद घेत आहेत. विस्टाडोम कोच नेरळ-माथेरान विभागात प्रचंड लोकप्रिय झाला आहे. सध्या या मार्गावर अप आणि डाऊन अशा प्रत्येकी दोन-दोन फेर्या सुरू आहेत.
शिवाजी सुतार
मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे