स्वच्छतागृहातील नळ चोरीला
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग येथील एसटी बस आगारात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तसेच मालमत्तेच्या संरक्षणासाठी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असले तरी प्रत्यक्षात सुरक्षेची यंत्रणा किती सक्षम आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आगारातील स्वच्छतागृहामधील वॉश बेसिनचे चारही नळ गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे आगारातील मालमत्ता सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अलिबाग हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असल्याने येथील एसटी आगाराला मोठे महत्त्व आहे. आगारात 75 हून अधिक एसटी बस कार्यरत असून, सुमारे 270 कर्मचारी येथे कार्यरत आहेत. शासकीय कामकाज, खासगी उद्योगधंदे, शैक्षणिक कारणे आणि दैनंदिन प्रवासासाठी हजारो प्रवासी या स्थानकाचा वापर करतात. दिवसाभरात मोठ्या प्रमाणावर प्रवासी वर्दळ असतानाही आगारातील सुरक्षेची स्थिती समाधानकारक नसल्याचे या प्रकारातून स्पष्ट होत आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आगार परिसरात आणि स्थानकाच्या विविध भागांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, तरीदेखील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांवरील नळ तसेच स्वच्छतागृहातील वॉश बेसिनचे नळ चोरीला जात असल्याची चर्चा आहे. सामाजिक बांधिलकीतून उभारण्यात आलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहात हात धुण्यासाठी चार वॉश बेसिन बसविण्यात आले होते. सर्व बेसिनला नळजोडणी करण्यात आली होती; परंतु हे नळच अज्ञात व्यक्तींनी लंपास केल्याचे निदर्शनास आले आहे.
या प्रकारामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. स्वच्छतागृहाचा वापर करताना मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. भुरट्या चोरांचा वावर वाढत असल्याची भीती व्यक्त केली जात असून, आगार प्रशासनाने सुरक्षा अधिक कडक करण्याची मागणी प्रवासी करत आहेत. सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत आहे का, चोरी नेमकी कधी झाली, संबंधित फुटेज तपासले गेले का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी बसविलेले काही नळ चोरीला गेल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. ही बाब गांभीर्याने घेतली असून, संबंधित कंत्राटदाराला तातडीने नवीन नळ बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जात आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी देखरेख अधिक कडक करण्यात येईल.
-राकेश देवरे,
अलिबाग आगार व्यवस्थापक
