एमएमआरडीएच्या कामांबाबत प्रश्‍नचिन्ह

अभियंत्यांचे दुर्लक्ष; पहिल्याच पावसात रस्ता गेला वाहून
। माथेरान । वार्ताहर ।
माथेरान शहरात मागील दोन वर्षापासून एमएमआरडीएच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकासकामे युद्धपातळीवर सुरू आहेत. परंतु ही होणारी विकासकामेसुद्धा नगरपरिषदेच्या अभियंत्यांचे होत असलेल्या दुर्लक्षामुळे युद्धपातळीवरच डबघाईला आलेली स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये सदर कामांच्या दर्जाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.
कस्तुरबा रोड येथे सुरू असलेल्या रस्त्याचे काम पहिल्याच पावसात वाहून गेले आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील नव्याने सुरू असलेल्या रस्त्याचे काम सुयोग्य पद्धतीने न केल्यामुळे सर्व दगडमाती नागरी वस्ती भागात विखुरली गेली आहे. त्यामुळे नागरिकांना चालणे अत्यंत जिकिरीचे आणि त्रासदायक बनले आहे.
कस्तुरबा रोड भागात सर्व मोठं मोठी हॉटेल इंडस्ट्री असून रस्ते सुस्थितीत असल्यास पर्यटकांना चालणे सुलभ होणार आहे. परंतु एमएमआरडीएमार्फत होत असणार्‍या या सर्वच विकासकामांवर नगरपरिषदेच्या अभियंत्यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे प्रत्येक कामात चालढकल केलेली दिसून येत आहे. पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी पेव्हर रस्त्यावर कुठल्याही प्रकारचा उतार केलेला नसून पाणी रस्त्याच्या मधोमध साठत आहे. नुकताच पाऊस सुरू झाला असून रस्त्याच्या बांधकामात वापरण्यात येणारे सामान अल्प प्रमाणात असल्याने कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत. त्यामुळेच ही होत असलेली कामे लवकरच डबघाईला आलेली दिसत आहेत. कधी नव्हे एवढा भरीव निधी एमएमआरडीएकडे आलेला आहे आणि जर अशीच कामे होत राहिली. तर आगामी काळात भावी पिढीला खूपच कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. निदान आतातरी लोकप्रतिनिधीनी सदर कामांवर आपले लक्ष केंद्रित करून होणार्‍या विकासकामे पारदर्शी असण्यासाठी ज्या-ज्या ठिकाणी कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली आहेत. त्या कामाची बिले अदा करू नयेत असे जाणकार मंडळींमधून बोलले जात आहे.

खूपच निकृष्ठ कामे केली जात आहेत. हे पाहून दुःख होत आहे. तीस गोणी ग्रीटमध्ये अवघी एक गोणी सिमेंटचा वापर केला जात आहे. तर कुठेही एकसंध कामे दिसून येत नाहीत. त्यामुळे लवकरच ही कामे पुन्हा करण्यासाठी नगरपरिषदेच्या तिजोरीवर पुढील काळात बोजा पडणार आहे.

शफीक दाऊद शेख, अध्यक्ष शेकापक्ष माथेरान

Exit mobile version