एसटी बसच्या टायरला मोठ्या चिरा; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
| पेण | प्रतिनिधी |
पेण शहरातून प्रवास करणाऱ्या अलिबाग डेपोच्या MH-20 BL 3645 या एसटी बसच्या मागील टायरला मोठ्या प्रमाणात चिरा गेल्याचे निदर्शनास आले आहे. धावत्या बसच्या टायरची अशी धोकादायक अवस्था पाहून प्रवासी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
बसच्या मागील टायरवर स्पष्टपणे मोठ्या चिरा दिसत असून, अशा अवस्थेत बस रस्त्यावर धावत असल्याने गंभीर अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. एसटी बसमधून दररोज शेकडो प्रवासी प्रवास करत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी बसच्या टायरसह इतर यांत्रिक बाबींची नियमित तपासणी करावी, अशी मागणी केली आहे. जीर्ण व धोकादायक टायर तातडीने बदलून प्रवाशांच्या जीविताशी होणारा धोका टाळावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, अलिबाग डेपोच्या MH-20 BL 3645 या बसची तातडीने तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, तसेच अशा अवस्थेतील वाहनांना प्रवासी सेवेत पाठवण्यापूर्वी त्यांची काटेकोर तपासणी करावी, अशी मागणी प्रवासी व नागरिकांकडून करण्यात आली आहे. या प्रकारामुळे एसटी महामंडळाच्या वाहन देखभाल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज व्यक्त होत आहे.
