| चिरनेर | प्रतिनिधी |
तीर्थक्षेत्र चिरनेर नगरीत बुधवारी (दि.3) संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने भाविकांनी श्री महागणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा लावून, आपल्या आराध्य देवतेचे दर्शन घेतले. यावेळी श्रींच्या तीर्थस्थानात भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. रायगड, नवी मुंबईसह हजारोंच्या संख्येने भाविक दाखल झाले होते. मंदिराचा गाभारा फुलांच्या माळांनी सजविण्यात आला होता. विशेषता छोट्या-मोठ्या व्यवसायिकांचा व्यवसाय तेजीत होता. परिसरातील दुकाने ग्राहकांनी गजबजली होती. शोभिवंत वस्तूंची दुकाने, हॉटेल, नारळ, हार, फुले, मातीची भांडी, पापड, कडधान्य विक्रेत्यांबरोबर प्रसाद व पेढेवाले सुखावले होते. आंबे, जांभळे, करवंदे, कंदमुळे, विविध जातीच्या रानभाज्या व फळे अशा रानमेव्याला तर मोठी मागणी होती. रानमेवा घेऊन अनेक आदिवासी व आगरी समाजाच्या महिला विक्रेत्या विक्री करताना दिसून आल्या. त्यामुळे श्री महागणपती मंदिर परिसरात मोठी वर्दळ दिसून आली. विशेषता मंदिरात येणारे भाविक येथून आवर्जून हा ग्रामीण रानमेवा खरेदी करताना दिसत होते. चिरनेर येथील श्री महागणपतीचे तीर्थस्थान हे पेशवेकालीन असल्याचा दाखला मिळत असला, तरी गणेश मंदिर हे पेशवेकालीन असून श्री महागणपतीची मूर्ती ही अत्यंत पुरातन असल्याचे दिसून येते. भाविकांच्या सोयीसाठी श्री गणपती देवस्थान तर्फे चोख व्यवस्था करत, गर्दीचे सुरळीत नियोजन करण्यात आले होते.
चिरनेरमध्ये महागणपतीच्या दर्शनासाठी रांगा
