आर.आर. स्पोर्ट्स, जय बजरंग, म्हसोबा क्रीडा, श्रीगणेश दिवलांग विजयी

| नागाव | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि निखिल मयेकर मित्रमंडळ, नागाव यांच्या संयुक्त विद्यमाने वरिष्ठ गट (पुरुष व महिला) रायगड जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धेला शनिवारपासून प्रारंभ झाला आहे. रविवारी खेळविण्यात आलेल्या 64 सामन्यांतून आर.आर. स्पोर्ट्स कर्जत, जय बजरंग रोहा, म्हसोबा क्रीडा शहापूर, श्रीगणेश दिवलांग या चार संघांनी विजयासह अंतिम 16 मध्ये स्थान मिळविले आहे. बुधवारी (दि.30) शेवटच्या दिवशी महिलांचे सामने खेळविण्यात येणार आहेत.

दरम्यान, चार दिवस पार पडलेलल्या 256 पुरुषांच्या सामन्यांतून अंतिम 16 मध्ये स्थान मिळविलेल्या संघांचे दुसर्‍या फेरीचे सामने बुधवारी दि. 30 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहेत. यामधून रायगड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेतून संभाव्य 20 खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रशिक्षण शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबिरानंतर पुरुष आणि महिलांच्या अंतिम खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. दरम्यान, याच दिवशी महिलांच्या 16 संघांचे सामनेदेखील खेळविण्यात येणार आहेत. या सामन्यांतून संभाव्य खेळाडूंची निवड करण्यात येईल.

नागावमधील संचालक मंडळ हायस्कूलच्या पटांगणावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील शनिवारी झालेले सर्वच सामने रंगतदार झाले. वेगवान, आक्रमक चढाया करीत प्रत्येक संघ एका-एका गुणासाठी दम ठोकत असल्याचे चित्र दिसून आले. पाच दिवसीय या स्पर्धेत जिल्हाभरातून पुरुषांचे 256, तर महिलांचे 16 संघ सहभागी झाले आहेत. जवळपास 272 सामन्यांचा थरार कबड्डीप्रेमींना अनुभवता येणार आहे. या स्पर्धेतील कामगिरीवरुन खेळाडूची जिल्हा पुरुष कबड्डी संघात निवड करण्यात येणार आहे. दरम्यान, सामने पाहण्यासाठी जिल्हाभरातून कबड्डीप्रेमींनी मोठी गर्दी केली आहे.

Exit mobile version