। पनवेल । वार्ताहर ।
ग्रामस्थ मंडळ ओवळे आयोजित गावदेवी ओवाळू माता यात्रेनिमित्त छकड्यांच्या जंगी शर्यतीचे आयोजन रविवारी (दि.24) नंदराज मुंगाजी यांच्या अध्यक्षतेखाली ओवळे येथील मैदानात करण्यात आले होते. या शर्यतींना महाराष्ट्र बैलगाडा संघटना अध्यक्ष पंढरी फडके यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
बैलगाडा शर्यत हा केवळ मनोरंजनाचा विषय राहिलेला नाही तर राज्याची परंपरा आणि शर्यतीबद्दल सर्वसामान्यांना किती प्रेम आहे याचे दर्शन रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील ओवळे येथील बैलगाडा शर्यतीच्या कार्यक्रमादरम्यान घडून आले आहे. ओवळे येथे ओवाळू माता यात्रेनिमित्त विना काठी लाठी भव्य बैलगाडा शर्यती पार पडल्या. गेल्या अनेक दिवसांपासून बैलगाड्या शर्यती पार पडलेल्या नव्हत्या. त्यामुळे यंदाच्या बैलगाडी शर्यतीचे एक वेगळेपण होते. या दरम्यान मोठी गर्दी होणार याचा अंदाज वर्तवला जात होता. अतिशय उत्साहात या छकड्यांच्या शर्यती ओवळे येथील मैदानात पार पडल्या. शासकीय नियमांचे पालन करून बैलगाडा शर्यत सुरू करण्यात आल्या. यावेळी अनेकांनी या छकड्यांच्या शर्यती पाहण्यासाठी छकडे प्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी शर्यती पाहण्यासाठी आलेल्या प्रेमींना पंढरीशेठ फडके आणि नंदराज मुंगाजी यांनी मार्गदर्शन केले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.






