राहीचा सुवर्णवेध!

25 मीटर पिस्तूल प्रकारात पटकाविले सुवर्णपदक
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
क्रोएशियामध्ये सुरू असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी वर्ल्डकपमध्ये भारतीय नेमबाज आणि मराठमोळ्या राही सरनोबतने 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. नेमबाजी वर्ल्डकपमध्ये भारतासाठी हे पहिले सुवर्णपदक आहे. अंतिम फेरीत राहीने 40 पैकी 39 गुण मिळवत सुवर्णपदक मिळविले.

25 मीटर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत राहीने फ्रेंच व रशियन नेमबाजांना मागे टाकत ही कामगिरी केली. अंतिम फेरीत मनु भाकेरला काही खास कामगिरी करता आले नाही आणि ती सातव्या स्थानावर राहिली. फ्रान्सची मॅथिलडे लामोलेला रौप्यपदक मिळाले. तिने अंतिम फेरीत 31 गुण मिळवले.

या वर्ल्डकपमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र स्पर्धेत सौरभ चौधरी आणि मनु भाकेर या भारतीय जोडीने रौप्यपदक जिंकले. यापूर्वी भारताने एक रौप्य व दोन कांस्यपदके जिंकली आहेत. सरनोबतने मिळविलेले सुवर्णपदक हे वर्ल्डकपमधील भारताचे पहिले सुवर्णपदक आहे. राहीच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Exit mobile version