| खोपोली | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी खालापूर नगरपंचायतीचे माजी नगरसेवक राहुल चव्हाण यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे खालापूर तालुक्यात तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून समर्थकांनी जल्लोष करत त्यांचे अभिनंदन केले. शेतकरी कामगार पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते असलेले राहुल चव्हाण यांची भटक्या व विमुक्त जाती प्रवर्गातून बेलदार समाजाचे प्रतिनिधी म्हणून प्रथमच रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर संचालक म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे बेलदार समाजालाही जिल्हा पातळीवरील सहकार क्षेत्रात प्रतिनिधित्व मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. निवडीनंतर राहुल चव्हाण यांनी आपल्या यशाचे श्रेय शेतकरी कामगार पक्षाचे नेते संतोष जंगम यांना देत, त्यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल व संधी दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले. तसेच, सहकार क्षेत्रातील शेतकरी, सभासद आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
राहुल चव्हाण यांची बिनविरोध निवड
