। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी ही घोषणा केली आहे. राहुल गांधी हे रायबरेलीचे खासदार आहेत. 2014 आणि 2019 मध्ये संख्याबळाच्या अभावामुळे लोकसभेला विरोधी पक्षनेते पद मिळाले नव्हते. तब्बल दहा वर्षानंतर आता राहुल गांधी हे देशाचे लोकसभेचे नवे विरोधी पक्षनेते असणार आहेत.
विरोधी पक्षनेत्याच्या जबाबदार्या पार पाडण्यासोबतच विरोधी पक्षनेता अनेक संयुक्त संसदीय पॅनेल आणि निवड समित्यांचाही एक भाग असतो. यामध्ये ईडीचे संचालक, केंद्रीय दक्षता आयुक्त, भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त, मुख्य माहिती आयुक्त, लोकायुक्त आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांची नियुक्ती करण्यासाठी समित्यांचा समावेश आहे. विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांचा या निर्णयांमध्ये थेट हस्तक्षेप असेल. या समित्यांच्या निर्णयांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचीही संमती आवश्यक असेल. राहुल गांधी सीबीआय आणि ईडी अशा इतर यंत्रणांबाबत सरकारला कोंडीत पकडू शकतात. अशा परिस्थितीत आता या एजन्सींच्या उच्च पदांवर नियुक्ती करण्यातही त्यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. यासोबतच विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी हे लेखा समितीचे प्रमुखही असतील. विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यानं नियमानुसार राहुल गांधींना ते सर्व अधिकार मिळतील जे एका कॅबिनेट मंत्र्याला दिले जातात.
काँग्रेसला 10 वर्षांनी लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद सुषमा स्वराज 2009 ते 2014 या काळात लोकसभेत विरोधी पक्षनेत्या होत्या. मात्र, त्यांच्यानंतर आता हे पद राहुल गांधी यांच्याकडे गेले आहे. तब्बल 10 वर्षांनी लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळालं आहे. 10 वर्षे विरोधी पक्षनेते न राहण्यामागचे कारण म्हणजे 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत कोणत्याही विरोधी पक्षाचे 54 खासदार विजयी झाले नाहीत. नियमांनुसार, विरोधी पक्षनेता होण्यासाठी लोकसभेच्या एकूण जागांपैकी 10% जागा म्हणजेच 54 खासदार असणे आवश्यक आहे. दोन्ही वेळा काँग्रेसकडे तेवढे खासदार नव्हते. मात्र, यावेळी काँग्रेसला 99 जागांवर विजय मिळवता आला आहे.
गांधी कुटुंबाला तिसर्यांदा पक्षनेते पद गांधी कुटुंबाला तिसर्यांदा हे पद मिळाले आहे. याआधी सोनिया गांधी विरोधी पक्षनेत्या राहिल्या आहेत. 13 ऑक्टोबर 1999 ते 6 फेब्रुवारी 2004 पर्यंत त्यांनी विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी सांभाळली. त्याशिवाय राजीव गांधी यांनीही 18 डिसेंबर 1989 ते 24 डिसेंबर 1990 पर्यंत विरोधी पक्षनेते राहिले आहेत. आता लोकसभेतील पक्षनेतेपदाची संधी राहुल गांधी यांना मिळाली आहे.