| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
वेस्ट इंडीजकडून टी-20 मालिकेत 3-2 असे पराभूत झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आगामी आशियाई करंडकासाठी संघामध्ये के. एल. राहुल व श्रेयस अय्यर या दोन्ही क्रिकेटपटूंचे पुनरागमन होण्याचे संकेत दिले आहेत. बंगळूरमधील क्रिकेट अकादमीत राहुल व अय्यर या दोघांनी कसून सराव केला. पण दोघेही एकदिवसीय क्रिकेटसाठी तंदुरुस्त आहेत का, हे पडताळले जाणार आहे.
त्यानंतरच निवड समितीकडून त्यांना हिरवा कंदील दाखवण्यात येईल. आशियाई करंडक श्रीलंकेत होणार आहे. तिथे कमालीची आद्रर्ता असते. अशा परिस्थितीत राहुल व अय्यर खेळू शकतील का, याचीही चाचपणी करण्यात येणार आहे. राहुल द्रविड याप्रसंगी म्हणाले, काही खेळाडू दुखापतीमधून बरे होत भारतीय संघात पुनरागमन करणार आहेत. अशा खेळाडूंना आशियाई करंडकात आम्ही खेळवणार आहोत.असे द्रविड यांनी सांगितले. द्रविड यांनी या वेळी जसप्रीत बुमराह, के. एल. राहुल व श्रेयस अय्यर यांचे पुनरागमन होईल याबाबत सांगितले. दरम्यान, आशियाई करंडकासाठी निवडण्यात येणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंसाठी बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबतही द्रविड यांनी माहिती दिली.