पालघरमध्ये बनावट कॉल सेंटरवर छापा

परदेशी नागरिकांची फसवणूक करणारी टोळी जेरबंद

। पालघर । प्रतिनिधी ।

पालघरमधील माहीम परिसरात सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून 5 जणांना अटक केली आहे. हे आरोपी कॉल सेंटरच्या माध्यमातून परदेशी नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करून डॉलरमध्ये पैसे उकळत होते.

पालघर पश्चिमेतील माहीम परिसरात सुंदरम शाळेच्या लगत असलेल्या फिया एकांत या इमारतीमधील तिसऱ्या माळ्यावर बेकायदा कॉल सेंटर सुरू होते. या कॉल सेंटरमधून आर्थिक आणि सायबर फसवणुकीचे प्रकार सुरू होते. पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेला याबाबतची माहिती समजल्यानंतर सोमवारी रात्री 12 वाजता या इमारतीत छापा टाकला. या कारवाईत 5 आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 4 लॅपटॉप, 12 मोबाईल फोन, 4 हेडफोन, राउटर व डोंगल जप्त करण्यात आले. आरोपी विदेशी नागरिकांना विविध आमिषे दाखवून आर्थिक गंडा घालत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

भरत ललानी (35) मीरा रोड, रोहित निंबाळकर (29) नायगाव, रोहित झोन्हे (23) मीरा रोड, अमरदीप गिल (24) पंजाब आणि सागर पाठडिया (29) अशी आरोपींची नावे आहेत.

पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पालघर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचही आरोपींना अटक करून 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असून आणखी मोठा सायबर रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

फसवणुकीची ‘हायटेक’ पद्धत
आरोपी स्वतःला मायक्रोसॉफ्ट किंवा अ‍ॅपल कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगून “डिव्हाइस व्हायरसग्रस्त आहे” अशी भीती दाखवत. त्यानंतर Lawes, Apple, Nike, Amazon गिफ्ट कार्डच्या माध्यमातून किमान 500 ते 4000 अमेरिकन डॉलर उकळून ती रक्कम यूएसडीटीमध्ये रूपांतरित करून हवाला मार्गे रोख स्वरूपात मिळवत असल्याचे तपासात समोर आले आहे.

Exit mobile version