| म्हसळा | प्रतिनिधी |
पुणे येथे विषारी गावठी दारू प्राशनामुळे 25 जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर राज्यभरात गावठी दारू निर्मितीविरोधात पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर म्हसळा पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील खामगाव आदिवासीवाडी येथे धडक कारवाई करत दोन गावठी हातभट्टी दारू अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. या कारवाईत तयार दारू, दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे रसायन व साहित्य जप्त करून नष्ट करण्यात आले असून, दोन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दि.11 जून रोजी सायंकाळच्या सुमारास खामगाव आदिवासीवाडी येथे पोलिसांनी छापा टाकला असता सुनील नरेश वाघरे (25) याच्या घराजवळ गावठी दारू निर्मितीचा अड्डा सुरू असल्याचे आढळून आले. या कारवाईत 13 लिटर गुळ व नवसागर मिश्रित पिवळ्या रंगाचे फेसयुक्त रसायन, तसेच 60 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू असा एकूण 4 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस शिपाई अक्षय दौलत पुरी यांच्या फिर्यादीवरून म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दुसऱ्या कारवाईत खामगाव आदिवासीवाडी येथील मोतीराम बाबू पवार (25) याच्या घराच्या आडोशाला ठेवलेल्या प्लास्टिक कॅनमधून 14 लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे. यावेळी सुमारे 1 हजार 400 रुपयांची दारू पोलिसांनी ताब्यात घेतली असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







