| महाड | प्रतिनिधी |
दरी-खोऱ्यातील खडतर वाटा, दमछाक करणारी चढण, अंगातून वाहणाऱ्या घामाच्या धारा आणि सोबतीला रायगडच्या जैवविविधतेचा आस्वाद घेत रायगड किल्ल्याला प्रदक्षिणा घालण्याची मजा काही औरच. स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाला प्रदक्षिणा घालण्याची इच्छा अनेकांच्या मनात असते. अशा साहस वीरांसाठी आणि रायगड प्रेमींसाठी रायगड जिल्हा परिषद आणि महाड युथ क्लबच्या सहकार्याने 24 डिसेंबरला राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणा करण्याची संधी चालून आली आहे. दरवर्षी किल्ले दर्शनासाठी लाखो पर्यटक येतात. परंतु रायगडाचा खरा इतिहास आणि परिसर समजून घ्यायचा असेल तर रायगड प्रदक्षिणा प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जवळपास 32 वर्षांपासून रायगड युथ क्लब हा उपक्रम राबवत आहे. दरवर्षी सुमारे हजार प्रदक्षिणार्थी यात सहभागी होतात. किल्ल्याच्या 16 किलोमीटरचा परिसर डोंगरवाटेने जात व चार तासांच्या खडतर प्रवासानंतर ही प्रदक्षिणा पूर्ण होते. साहसवीरांना आव्हान देणारी आणि आपल्या शारीरिक शक्तीचे मूल्यांकन करणारी ही प्रदक्षिणा असली तरी ती पूर्ण झाल्यानंतर एक आत्मिक समाधान मिळते. या प्रदक्षिणेमध्ये कधी पक्ष्यांची किलबिलाट कानी पडतो तर कधी सरपटणाऱ्या प्राण्यांचा फुत्कार, जाळीदार वृक्षांची थंडगार सावली तर कधी अंगातून निघणाऱ्या घामाच्या धारा, उंच अरुंद चढण तर कधी खाली कोसळू असे तीव्र उतार असे एकापेक्षा एक सरस विविध पडाव प्रदक्षिणेत पार करण्याचा एक वेगळा अनुभव मिळतो. लहानांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण या प्रदक्षिणेत सहभागी होत असल्याने अनुभवाची मोठी शिदोरी प्रदक्षिणार्थींकडे जमा होते.
अशी असते प्रदक्षिणा रायगड प्रदक्षिणेला 24 डिसेंबरला सकाळी 6 वाजता पायथ्यापासून सुरुवात होणार आहे. प्रदक्षिणेत 10 वर्षावरील कोणतीही सुदृढ व्यक्ती सहभागी होऊ शकते. 50 वर्षांवरील व्यक्तीला फिटनेस सर्टिफिकेट आवश्यक आहे. 16 किलोमीटरची ही प्रदक्षिणा पूर्ण करायला प्रत्येकाच्या क्षमतेप्रमाणे किमान 4 तासाचा अवधी लागतो. प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्यांना युथ क्लबतर्फे प्रशस्तीपत्रक दिले जाणार आहे. सहभागी होणाऱ्यांना मुक्कामाची सोय विनामूल्य केली जाते. तसेच प्रदक्षिणेच्या दिवशी चहा नाश्ता, पॅक फूड व जेवण आयोजकांमार्फत दिले जाते.
सहभागी होणाऱ्यांसाठी हे आवश्यक प्रदक्षिणेत सहभागी होणाऱ्यांनी आपल्या सोबत पाण्याची बाटली, लंच बॉक्स, टोपी, सुती कपडे, अंथरूण व पांघरूण, लागणारी औषधे सोबत आणावीत. रायगडला जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील महाड येथून 25 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. मुंबई-पुणे येथून थेट बससेवा आहेत. तसेच कोकण रेल्वेमार्गावर वीर किंवा माणगाव स्थानकावर उतरून रायगडला जाता येते.