आयुक्त रुबल अग्रवाल यांचे आवाहन
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
नागाव समुद्रकिनारी रोबाटीक बोयोची कार्यपद्धत प्रत्यक्ष अनुभवली. काशीद समुद्रात बूडणाऱ्या पर्यटकाला बोयाच्या मदतीने वाचविण्यात आले आहे. बोयोच्या कार्यपद्धतीविषयी प्रत्यक्ष जाणून घेतल्यानंतर समाधान व्यक्त करीत कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले की, या भागात पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. पर्यटक व आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन तत्पर तसेच सज्ज आहे. मात्र, पर्यटक आणि नागरिकांंनीदेखील स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.
रोबोटिक बोयो या जीवरक्षक यंत्राचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल या शुक्रवारी (दि.22) नागाव येथील समुद्रकिनारी आल्या होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी रविंद्र शेळके, तहसीलदार विक्रम पाटील, गटविकास अधिकारी शर्मिला पाटील, नागावचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर, ग्रामपंचायत अधिकारी श्वेता कदम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, नागावच्या उपसरपंच मंगला नागे, सदस्य प्रियंका काठे, निकीता पाडेकर, विना पिंपळे, रोहीणी घरत, मंडळ अधिकारी सखाराम आगे, ग्राम महसूल अधिकारी राम घुमरे, महसूल सेवक ममतेश पाटील, ग्रामपंचायतमधील सतिश ठाकूर, विनेश नागवेकर, दिपक शहाबाजकर, स्वप्नील कवाड, सोनाली राणे, प्रणाली दळवी, रश्मी वाडकर, कल्पेश नाईक, मंदार म्हात्रे, रमेश कवळे, प्रशांत कीर, रोबोटिक बोयो चालक मनीष म्हात्रे, व मानकर आदी उपस्थित होते.
यावेळी कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल म्हणाल्या की, पावसाचा हंगाम लवकरच सुरु होणार आहे. मान्सून पुर्व तयारी केली जात आहे. याबाबत विभागस्तरासह जिल्हास्तरावर वेगवेगळ्या बैठका घेण्यात आल्या आहेत. कोकण विभागात रायगड सर्वात संवेदनशील जिल्हा आहे. जिल्ह्यात मान्सूनचा प्रभाव राहतो. काशिदमध्ये बोयाच्या माध्यमातून पर्यटकांना वाचविण्याचे काम केल्याची माहिती मिळाली. त्यामुळे नागावमधील रोबोटीकचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी आले. बोयाची कार्यपद्धती समजून घेतली. अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन दिसून आले आहे. रोबोटिक बोयो खऱ्या अर्थाने जीव रक्षक म्हणून ठरल्याचे कौतूक अग्रवाल यांनी केले. दरम्यान, नागाव समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांसह तेथील कामाची पद्धत, सोयी सुविधांची माहितीदेखील घेण्यात आली.






