राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेत रायगड काँग्रेसचा डंका

। उरण । प्रतिनिधी ।
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्र राज्यात नांदेड येथे दाखल झाल्यापासून रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत हे त्यांच्या शेकडो पदाधिकार्‍यांसह भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत.

दि. 17 नोव्हेंबर रोजी वाडेगाव ता. अकोला येथे महेंद्र घरत यांना राहुल गांधी यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी मिळाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही उपस्थित होते. स्व. बॅ. अंतुले साहेबांच्या रायगड जिल्ह्याची जबाबदारी महेंद्र घरत यांच्यावर दिली असून महेंद्र घरत यांनी रायगड काँग्रेसला नवसंजीवनी दिल्याचे नाना पटोलेंनी राहुल गांधी यांना सांगितले.

रायगड जिल्हा काँग्रेस तर्फे वाडेगाव ता. अकोला येथे दि. 17 नोव्हेंबर रोजी पदयात्रेच्या मार्गावर कोळी नृत्याचे सादरीकर करण्यात आले. राहुल गांधी यांनी याची दखल घेत कलाकारांना स्वतः हात करून जवळ बोलावून घेतले. यावेळी रायगड काँग्रेस तर्फे कोळी समाजाचे प्रतिक मच्छीमार बोट त्यांना भेट देण्यात आली. राहुल गांधी यांनी त्याचा सन्मानपूर्वक स्वीकार केला.

रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांच्यासोबत जिल्ह्यातील दोनशे कार्यकर्ते व कोळी नृत्याने पदयात्रा दणाणून सोडली. पदयात्रेत त्या दिवशी रायगड जिल्ह्याचाच बोलबाला होता. जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या अकोला येथील पदयात्रेच्या नियोजनाचे सर्वत्र कौतुक केले गेले.

Exit mobile version