एक व्यक्ती अलिबागमध्ये, तर अन्य राजस्थानला फरार
| रायगड | खास प्रतिनिधी |
काही दिवसांपूर्वी नाशिकमधील एका बँकेमध्ये हवालाकांड झाल्याचे समोर आले होते. हवालामार्फत सुमारे हजार कोटींहून अधिकच्या रकमेचे व्यवहार झाल्याचे बोलले जाते. त्याचप्रमाणे राज्याचा काही भागांमध्ये हवालाची अनेक प्रकरणे समोर आली होती. अशाच एका प्रकरणातील हवालाकांडाचे कनेक्शन हे अलिबागपर्यंत आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी ‘कृषीवल’शी बोलताना सांगितले.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी नाशिकमध्ये एक हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचा हवालाकांड झाल्याचा आरोप केला होता. हा हवालाकांड नाशिक मर्चंट बँकेत झाला असून, हवालाकांडमधील एक हजार कोटींहून अधिकची रक्कम वोट जिहादसाठी वापरल्याचा आरोपी सोमय्या यांनी केला होता. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी अटकेचे सत्र राबवले. पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना बेड्या ठोकल्या. संबंधित आरोपी दुबईला विमानाने पळून जात होते, पण त्यांचा हा मनसुबा पोलिसांनी उधळून लावत त्यांना अहमदाबाद विमानतळावरून अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण आठ जणांना अटक केली आहे, अशा आशयाचे वृत्त प्रसार माध्यमांमध्ये प्रकाशित झाले होते.
त्याच हवालाकांडाचे हे कनेक्शन आहे की अन्य कोणत्या? त्यानुसारच अलिबागमध्ये एका व्यक्तीला पोलिसांनी नोटीस बजावल्याचे बोलले जाते. सदरचा व्यक्तीकडे अनेकांच्या बँक खात्याचा तपशील आढळून आला. विविध बँक खात्यांतून सुमारे 10 कोटींहून अधिकच्या रकमेचे व्यवहार झाल्याचे सूत्रांनी सांगितले. सदरचा व्यक्ती हा अन्य एका अलिबागमधील व्यक्तीच्या संपर्कात होता. सध्या ती व्यक्ती राजस्थानमधील एका गावात गेल्याची चर्चा आहे.
दरम्यान, अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना याबाबत विचारणा केली असता, याबाबत नाशिक पोलिसांनी अथवा अन्य यंत्रणांनी कारवाई केल्याबाबतची माहिती नसल्याचे ‘कृषीवल’शी बोलताना सांगितले.
हवाला म्हणजे काय?
पैशाला हातही न लावता ते जगाच्या एका भागातून दुसर्या भागात पोहोचवले जातात. त्यासाठी बँकांची गरज नाही किंवा करन्सी एक्सचेंजचीही गरज भासत नाही. गरज असते ती केवळ पैसे पाठवणारा, पैसे स्वीकारणारा आणि दोन मध्यस्थ यांची. यालाच हवाला असे म्हणतात. पारंपरिक बँकिंग यंत्रणा अस्तित्वात येण्याच्या खूप पूर्वीपासून ही पद्धत अस्तित्वात आहे. सोपी पद्धत आणि याच्याशी संबंधितांना मिळणार्या अनेक फायद्यांमुळे शेकडो वर्षांपासून हवाला अस्तित्वात आहे. या माध्यमातून जगभरात लाखो डॉलरचे व्यवहार होतात. विशेष म्हणजे, हे कोण करतंय किंवा किती रक्कम आहे हेदेखील सांगितले जात नाही. हवालाचा व्यवहार बेकायदेशीर ठरवण्यात आला आहे.