| धुळे | प्रतिनिधी |
छत्रपती संभाजीनगरहून सोलापूरला जाणाऱ्या भरधाव बसने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अंबड फाट्यावर मंगळवारी (दि.28) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला. पाचोड पोलिसांनी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. भाऊसाहेब टकले (67), ता. नेवासा असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून, रंभाजी पावले (30), ता. शेवगावअसे गंभीर जखमीचे नाव आहे.
अंबड येथे ऊसतोडणीच्या कामासाठी आलेले कामगार भाऊसाहेब टकले व त्याचे नातेवाईक रभाजी पावले हे दोघे दुचाकीने नातेवाइकांना भेटण्यासाठी अंबड येथे जात होते. अंबड फाट्याजवळ वळण घेताना छत्रपती संभाजीनगरकडून सोलापूरकडे भरधाव जाणाऱ्या सोलापूर आगाराच्या बसने त्यांच्या दुचाकीस जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील भाऊसाहेब टकले यांच्या डोके, हात व पायास गंभीर मार लागून ते जागीच ठार झाले, तर रायबा पावले हे गंभीर जखमी झाले. ही घटना घडताच अंबड फाट्यावरील हॉटेलवरील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना तातडीने पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भाऊसाहेब टकले यांना तपासून मृत घोषित केले, तर रायबा पावले यांच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारार्थ तातडीने रुग्णवाहिकेद्वारे छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविले.