| उत्तर प्रदेश | वृत्तसंस्था |
प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या कुंभमेळ्यात संगम किनाऱ्यावर मौनी अमावस्येमुळे करोडो भाविकांची गर्दी जमली होती. यादरम्यान मध्यरात्री 1 वाजता (दि.29) रोजी संगम किनाऱ्यावर अमृतस्नानापूर्वी मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली.
मिळालेल्या माहितीनूसार, या घटनेत आतापर्यंत बारा हुन अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती केली जात व्यक्त आहे. तर जवळपास 50 ते 80 भाविक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. महाकुंभमेळ्यातील मौनी अमावस्येचे मुख्य स्नान असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास संगम किनाऱ्यावर गर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्याने चेंगराचेंगरी झाली. भाविक इकडेतिकडे पळू लागले. यादरम्यान अनेकजण खाली पडून जखमी झाले. संगम किनाऱ्यावर गर्दी वाढल्याने पोलीस लोकांना घाटावरुन बाजूला करत होते. त्यावेळी लोक जोरदार पळू लागले आणि स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. या घटनेनंतर तात्काळ जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर आखाडा परिषदेने मौनी अमावस्येच्या दिवशी अमृत स्नान होणार नाही असा निर्णय घेतला आहे. आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी म्हणाले की, आज प्रयागराज महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर, आखाड्याने मौनी अमावस्येला अमृत स्नानाचा कार्यक्रम पूर्णपणे रद्द केला आहे. आज कोणताही आखाडा अमृत स्नान करणार नाही. आखाड्याने छावण्यांमधील त्यांच्या मिरवणुकाही मागे घेतल्या आहेत.